
मराठा आरक्षण आंदोलनाचे सर्वाधिक पडसाद बीड जिल्ह्यात उमटल्याने लोकसभेपाठोपाठ होत असलेल्या विधानसभा निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशी दरी रुंदावत चालल्याने उमेदवारांना देखील सगळी समीकरणे लक्षात घेऊन भाषणे करावी लागत आहेत.
मराठा-ओबीसी गावगाड्याचे समीकरण डोळ्यासमोर ठेवून यावर भाष्य करताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजलगाव विधानसभेचे उमेदवार प्रकाश सोळंके भावुक झाले.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर काही जणांकडून बीडमधील ओबीसींची घरे लक्ष्य करण्यात आली. मराठा आंदोलनात माझ्यासकट माझ्या भावाचे घर जाळण्यात आले, अशी आठवण सांगत प्रकाश सोळंके भावुक झाले.
मराठा आरक्षणाला मी विरोध केला नव्हता. तरीही माझे घर का जाळण्यात आले? आंदोलन करण्याची ही कोणती पद्धत होती? या काळात आम्हाला घरातून पळून जावे लागले. दोन अडीच वर्षाच्या माझ्या नातवाला बंगल्यावरून खाली झेलावे लागते, अशी आंदोलन काळात ओढावलेली आपबीती सांगताना प्रकाश सोळंके यांना गहिवरून आले होते. तसेच एवढे सगळे होऊनही मी याबद्दल पोलिसांत तक्रार केली नव्हती, असे सांगत जर तक्रार केली असेल तर मला भर चौकात फाशी द्या, असे प्रकाश सोळंके म्हणाले.
….तर मला भर चौकात फाशी द्या
मी एकाही आंदोलनकर्त्यांच्या नावाने तक्रार दिली नाही. पोलिसांना सांगून कुणाविरोधात कारवाई देखील करायला लावली नाही. इतर घटनांमध्ये पोलिसांनी कारवाई केली. असे असताना मी तक्रार केली म्हणून माझी बदनामीची मोहीम चालविण्यात आली. खरोखर मी तक्रार केली असेल तर मला भर चौकात फाशी द्या, असे सोळंके म्हणाले.
माजलगावमध्ये यंदा तिरंगी लढत
राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीरपणे सोळंके यांनी सांगितले होते. परंतु यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आग्रह केल्याने त्यांनी यंदा लढविण्याचे ठरवले. त्यांच्याविरोधात शरदचंद्र पवार पक्षाकडून मोहन जगताप निवडणूक लढवित आहेत तर सोळंके यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेले रमेश आडसकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.