बारामतीमधील काका पुतण्याच्या संघर्षपूर्ण लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. बुधवारी मतदानाच्या दिवशी सकाळपासून अजित पवार आणि युगेंद्र पवार यांचे वडील म्हणजेच अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार विविध मतदान केंद्रावर जाऊन परिस्थितीची पाहणी करत आहेत.
तेथील बुथ प्रमुखांना भेटून मतदानाची माहिती घेत आहेत तसेच मतदारांशी देखील संवाद साधत आहे.
अशाच एका बुथवरती श्रीनिवास पवार आणि अजित पवार हे एकाच वेळी पाहणी करण्यासाठी आलेले होते. दोघांभोवती देखील कार्यकर्त्यांचा मोठा गराडा होता. सकाळपासून झालेल्या मतदानाची माहिती कार्यकर्ते पदाधिकारी दोघा नेत्यांनाही देत होते. मतदानाच्या टक्केवारीपासून वाड्या वस्त्यांवरील मतदारांची मतदान केंद्रापर्यंत ने आण करणे आदी विषसंबंधीची माहिती नेते घेत होते.
श्रीनिवास पवार आणि अजित पवार एकाच मतदान केंद्रावर आले खरे पण दोघांनीही एकमेकांशी बोलणे टाळले. आपापल्या कार्यकर्त्यांशी बोलून, मतदान प्रक्रियेवर चर्चा करून काही वेळात दोघेही तेथून निघून गेले. आपण अजित पवार यांच्याशी का बोलला नाहीत? असे श्रीनिवास पवार यांना विचारले असता, दादा कामात व्यस्त होते. त्यामुळे मी भेट घेण्यासाठी गेलो नाही, असे कारण श्रीनिवास पवार यांनी सांगितले.
श्रीनिवास पवार हे अजिदादांचे सख्खे लहान बंधू. अजित पवार यांनी ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्याच्या दोन दिवस आधी अजित पवार हे श्रीनिवास पवार यांच्या मुंबईतील घरी राहायला होते. अजित पवार हे भाजपच्या सरकारमध्ये राहायला होते. अजित पवार हे भाजपच्या सरकारमध्ये सामिल होऊन फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतील, हे दस्तुरखुद्द शरद पवार यांनाही माहिती नव्हते, ती गोष्ट श्रीनिवास पवार यांना माहिती होती. शपथ घेण्याआधी अजित पवार यांनी आपल्या लहान भावाची याची कल्पना दिली होती. म्हणजेच अजित पवार आणि श्रीनिवास पवार यांचे सख्खे बंधू अतिशय उत्तम संबंध होते. म्हणजेच नात्यापैकी राजकारण येणार नाही, याची पुरेपूर काळजी दोघांकडूनही घेण्यात येत होती.
परंतु राष्ट्रवादीतील पक्षफुटीनंतर अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्यावर हल्ला सुरू केल्यानंतर श्रीनिवास पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी सुप्रिया सुळे यांचा खुला प्रचार केला. तेव्हापासूनच अजित पवार आणि श्रीनिवास पवार यांच्यात अंतर पडत गेले. आता तर अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार उभे राहल्याने दोघाभावांमध्ये कमालीचे अंतर आले आहे. दोघेही एकमेकांवर टीकेची एकही संधी सोडत नाही. खासगीत बोलताना मात्र नात्यामध्ये राजकारण यायला नको होते, असे दोघेही म्हणतात.
