
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाले. या निकालांमध्ये अनेकांचे अंदाज चुकले. सत्तारुढ महायुतीला दणदणीत बहुमत मिळालं. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री कोण होणार?
हे अद्याप नक्की झालेलं नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निर्णय मान्य करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानंतर सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे.
मुख्यमंत्रीपदाचं नाव निश्चित होण्यापूर्वी शपथविधीचा मुहूर्त ठरलाय. पाच डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची 4 डिसेंबर रोजी बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये विधीमंडळाचा गटनेता निवडला जाईल.
भारतीय जनता पार्टीनं अद्याप मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. नव्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे सहभागी होणार का? शिंदे उपमुख्यमंत्री होणार का? ते उपमुख्यमंत्री झाले तर त्यांना आणखी कोणती खाती मिळणार? शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्यास नकार दिला तर त्यांच्या पक्षातील अन्य कोणता नेता उपमुख्यमंत्री होणार? या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही.
भाजपाकडून मुख्यमंत्री आणि शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप जाहीर झालेलं नाही. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबतचे स्पष्ट संकेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्रीपदाचं नाव अद्याप जाहीर झालेलं नाही. पण, आम्ही आमचा गटनेता म्हणून अजित पवारांची निवड केली आहे, असं त्यांनी सांगितलं. तटकरेंनी एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
भारतीय जनता पार्टीनं 2 वरिष्ठ निरीक्षकांची नेमणूक केली आहे. पाच तारखेला संध्याकाळी नवीन सरकारचा शपथविधी होईल. कुणाला किती मंत्रीपद मिळणार यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. महायुतीचं सरकार आहे. त्यामध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्रिपदाची शपथ घेतील, असं तटकरे यांनी स्पष्ट केलं. अजित पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री
अजित पवार शरद पवारांपासून वेगळं झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली होती. पण, विधानसभेत त्यांनी हे अपयश धुऊन काढलं. अजित पवारांच्या पक्षाचे 41 आमदार या निवडणुकीत विजयी झाले. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 10 जागांवर समाधान मानावं लागलं.
अजित पवार आता सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता. यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना 2 वेळा, तर देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार उपमुख्यमंत्री होते. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात (2019-24) झालेल्या तीन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होते.