
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. तर, दुसरीकडे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आरोपांचा धुरळा उडवला आहे
धस यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाणारे वाल्मिक कराड यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. सुरेश धस यांनी आता 9 अब्जाच्या व्यवहाराचा उल्लेख केला आहे.
आष्टीतील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीडच्या टेंभुर्णी गावातील एका व्यक्तीच्या नावावर नऊ अब्ज रुपयांचे व्यवहार झाल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या व्यवहाराची यंत्रणेने चौकशी केली पाहिजे अशी मागणी देखील धस यांनी केली. या व्यवहारांमध्ये आणखी लोकांचा सहभाग असण्याची शक्यता धस यांनी वर्तवली. जिल्ह्यात घडणाऱ्या सर्व प्रकरणांच्या मागे ‘आका’ असल्याच्या दाव्याचा पुनरुच्चार ही धस यांनी केला. आमदार सुरेश धस यांनी शुक्रवारी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आमदार धस यांच्याकडून सातत्याने धनंजय मुंडेंवर निशाणा साधला जात आहे. धस यांनी महादेव अॅपच्या माध्यमातून घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. याची लिंक थेट मलेशियापर्यंत असून बीडमधून चांगल्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या नेत्यांनी त्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना आणून भ्रष्टाचार केला असल्याचा दावाही धस यांनी केला. जिल्ह्यातील कोणत्याही प्रकरणा मागेॉ, कुठल्याही घटने मागे एकच ‘आका’ असतो असा आरोपही त्यांनी केला.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय मोर्चा…
मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख हत्ये निषेधार्थ आज बीड मध्ये सर्वपक्षीय निषेध महामोर्चा निघणार आहे. यात मयत संतोष देशमुख यांचे कुटुंब, मनोज जरंगे पाटील, संभाजी राजे छत्रपती, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, भाजप आमदार सुरेश धस , राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, अंजली दमानिया, विनोद पाटील, यांच्यासह अनेक आजी-माजी आमदार, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांनी काही जणांची चौकशीदेखील केली.