
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जिल्हा, जो जिल्हा नेहमी पाण्याची चातकासारखी वाट पाहतो, त्याच बीडमध्ये तब्बल बाराशेहून अधिक जणांकडे शस्त्र परवाने असल्याचे वृत्त आल्यानंतर समाजाची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरू आहे, असा प्रश्न अनेकांना पडला.
बीडच्या ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेला बेफामपणे देण्यात येणारे शस्त्र परवानेही कारणीभूत असल्याची चर्चा आहे. हाच मुद्दा भाजप आमदार सुरेश धस यांनी लावून धरत बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली.
बीड जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी ज्यांच्याकडे अग्निशस्त्रे परवाने देण्याचे अधिकार आहेत, त्यांनी चिरमिरी घेऊन शेकडो जणांना परवाने दिले, असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला. तसेच काही लोकप्रतिधींनी देखील अमुक तमुकांना परवाने द्या, अशा शिफारसी पोलीस अधिकाऱ्यांना केल्या, त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली. पैसे घेऊन जर अधिकारी अग्निशस्त्रे परवाने देणार असतील तर बीडचे बिहार नाही तर काबुलीस्तान होईल, असेही धस म्हणाले.
माझ्याकडं बरेच जण यायचे, मला पिस्तूल पाहिजे पण….
बीडमध्ये अनेकांना पिस्तूल वापरण्याचा हौस आहे. लग्नाला गेले तरी कमरेला पिस्तूल, चौकात आले तरी बंदूक, शहर-खेडेगावात ठॉय ठॉय…. हे प्रकार सुरू आहेत? माझ्याकडेही काही जण बंदूक पाहिजे म्हणून आले होते. अग्निशस्त्र परवाना मिळविण्यासाठी तुम्ही आमची शिफारस करा, असे काही जण म्हणत होते. मात्र मी स्पष्टपणे इन्कार करून येथून निघा… असे बजावले, असा अनुभव सुरेश धस यांनी सांगितला.
जिल्हाधिकारी साहेब बंदूकराज मोडित काढा अन्यथा…
बीड जिल्ह्यातले बंदूकराज जिल्हाधिकाऱ्यांनी मोडित काढावे. ज्यांना ज्यांना बेकायदेशीररित्या शस्त्रे परवाने दिलेत, त्यांची चौकशी करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत. जर पुढच्या १५ दिवसांत हे काम जिल्हाधिकाऱ्यांनी केले नाही तर आम्ही त्यांच्यावरही कारवाईची मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करू, असे सुरेश धस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनीच बीडच्या पालकमंत्रिपदाची सूत्रे हातात घ्यावी
यावेळी त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी बीडचे पालकमंत्रिपद मागील काळात भाड्याने दिले होते, अशी टिप्पणी करून देवेंद्र फडणवीस यांनीच बीड जिल्हा पालकमंत्रिपदाची सूत्रे हातात घ्यावी, अशी मागणी केली.