
सुरेश धस यांचे बदलते सूर..!
संतोष देशमुख प्रकरणांमध्ये गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी बीडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस यंत्रणेला 150 ते 200 च्या स्पीडने कामाला लावले आहे, असे वक्तव्य करून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आपले बदललेले सूर आज दाखवून दिले.
संतोष देशमुख प्रकरणांमध्ये सुरेश धस यांनी सुरवातीला आपल्याच सरकारला घेरले होते. मुंडे परिवारासोबतचे आपले जुने राजकीय वैर उगाळताना सुरेश धस महायुती सरकारवर फैरी झाडत होते. त्यात त्यांनी प्राजक्ता माळीचा विषय आपल्यावर ओढवून घेतला होता, पण प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन आणि नंतर थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सुरेश धस यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.
पण या सगळ्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख प्रकरणाची सीआयडी चौकशी आणि तपास वेगवान करून वाल्मीक कराडसह सर्व आरोपींच्या मालमत्ता जप्तीचे आदेश दिले. त्या सगळ्यांची बँक खाते गोठवली. त्यामुळे सगळ्या आरोपींच्या नाड्या पुरत्या आवळल्या गेल्या. वाल्मीक कराड शरण येण्याच्या बातम्या सुरू झाल्या.
भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांना परखड शब्दांमध्ये समज दिली. त्यानंतर सुरेश धस यांचे सूर बदलले. बावनकुळे हे माझे नेते आहेत. ते राज्याचे नेते आहेत. त्यांचे मी ऐकतो तपासात कुठलाही अडथळा आणत नाही. मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये सगळी पोलीस यंत्र दीडशे ते दोनशेच्या स्पीडने कामाला लावली आहे. त्यामुळे गुन्हेगारांच्या नाड्या आवळल्या आहेत. परळी तालुक्यातल्या दाऊदपूर मध्ये देखील वाळू उपसा चोरांच्या नाड्या अशाच आवळल्या गेल्या पाहिजेत, असे सुरेश धस म्हणाले.