
राज्यभर गाजत असलेल्या बीडच्या खंडणी आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याने मंगळवारी सीआयडीसमोर शरणागती पत्करली.
त्यानंतर केजमधील कोर्टाने कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. थाटात जगत असलेल्या वाल्मिक कराडची तुरुंगातील पहिली रात्र फारशी चांगली राहिली नसल्याचे समोर आले आहे.
पुण्यात सीआयडी मुख्यालयात शरण आलेल्या वाल्मिक कराडची चौकशी करून त्याला केज कोर्टात हजर करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्याची सुनावणी सुरू होती. केज कोर्टाने वाल्मिक कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. त्यानंतर पोलिसांनी त्याची रवानगी तुरुंगात केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराड याने रात्रीपासून जेवण घेतले नाही. सकाळी नाश्ताही केला नाही. वाल्मिक कराडला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे. रात्री कराड हा ऑक्सिजन लावून झोपला होता, अशी माहितीदेखील सूत्रांनी दिली.
रात्री उशिरा तुरुंगात गेल्याने वाल्मिक कराड हा सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास उठला. सकाळी आवरल्यानंतर त्याने चहा, नाश्तादेखील घेतला नाही. वाल्मिक कराडला मधुमेहचा त्रास आहे. त्यामुळे कराडला आग्रह केल्यानंतर त्याने सकाळी 11.30 वाजता सरकारी जेवण घेतले. त्यावेळी त्याने अर्धी चपाती खाल्ली. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास भात किंवा खिचडी देण्याची मागणी त्याने केली असल्याचे समजते.
अन्य तीन आरोपींचा शोध सुरू
संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत. या तिन्ही आरोपींचा शोध सुरू आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार आहेत. वाल्मिक कराडसाठी हे काम करत असल्याचे म्हटले जात आहे. आता वाल्मिक कराड हा सीआयडीसमोर शरण आला. त्यानंतर आता या मुख्य आरोपींचा शोध सुरू झाला आहे.
सीआयडीला अटक करण्यात यश मिळणार का?
आरोपी वाल्मिक कराड याने मंगळवारी सीआयडीसमोर शरणागती पत्करली. संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणाच्या जवळपास 22 दिवसानंतर वाल्मिक कराडने सीआयडीसमोर सरेंडर केले. वाल्मिक कराडला अटक करता न येणे हे सीआयडीचे अपयश असल्याची टीका करण्यात येत आहे. त्यामुळे आता सीआयडीसमोर फरार असलेल्या तिन्ही आरोपींना अटक करण्याचे मोठं आव्हान आहे.