शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असतात. त्यांच्या या विधानावरुन राजकीय नेतेमंडळींमध्ये जुंपल्याचेही अनेकदा दिसून आलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर या भेटीते फोटो शेअर करत शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी घेतलेल्या भेटीची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये भिडे यांचे आभार मानले आहेत.
फडणवीस पोस्टमध्ये म्हणतात, संभाजी भिडे गुरुजी यांची आज सातारा दौर्यादरम्यान शिरवळ येथे भेट झाली. यावेळी केलेल्या स्वागतासाठी आणि दिलेल्या आशीर्वादासाठी भिडे गुरुजी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केलं आहे.फडणवीसांनी पोस्टसोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये छगन भुजबळही (Chhagan Bhujbal) मंचावर उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे.
छगन भुजबळ आणि संभाजी भिडे यांच्यात काही महिन्यांपूर्वी मोठा वाद पेटला होता. भुजबळांनी भिडेंवर टीका करतानाच मनोहर कुलकर्णी असं नाव असलेला व्यक्ती संभाजी भिडे नाव धारण करतो, पण ब्राह्मण समाजात संभाजी नाव ठेवलंच जात नाही,असं विधान केलं होतं. त्यामुळे संभाजी भिडे नक्की कोण आहेत ते सांगावं? असंही भुजबळांनी म्हटलं होतं.यानंतर ब्राह्मण समाज विरुद्ध छगन भुजबळ असा वाद सुरू झाला आहे. यावर आजही त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी वादग्रस्त विधान करणार्या संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधतानाच ब्राह्मण समाजात शिवाजी,संभाजी अशी नावे ठेवत नाहीत,असा नवा वाद ओढवून घेतला होता.संभाजी भिडेंचे खरे नाव मनोहर कुलकर्णी आहे. कुठल्याही ब्राह्मण घरामध्ये कोणीही शिवाजी,संभाजी अशी नावे ठेवत नाहीत. हा माणूस उठसूट कोणावरही टीका करतो.इतिहास मोडणाऱ्यांविरोधात आपल्याला उभे राहावे लागेल.यावेळी भुजबळांनी आपल्या वक्तव्याचं ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये असंही म्हटलं होतं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री छगन भुजबळ हे सावित्रीबाई फुले यांंच्या जयंतीनिमित्त सातारा दौऱ्यावर आले होते.तसेच हे दोन्हीही नेते एकाच मंचावर दिसून आले होते. या कार्यक्रमात या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. या कार्यक्रमाला जाताना या दोन्ही नेत्यांनी 50 मिनिटं एकाच गाडीतून प्रवासही केला होता.
यावरुन मंत्रिपद नाकारल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भुजबळ नाराज असल्याचे बोलले जात असून ते भाजप वाटेवर असल्याचीही चर्चा आहे. याचदरम्यान, एकेकाळी कट्टर विरोध केलेल्या संभाजी भिडे यांंनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत त्यांचा सत्कारही केला. फडणवीसांनीही त्यांना वाकून नमस्कार केल्याचेही या संंबंधित फोटोत दिसून येत आहे.
