मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं सूचक हास्य, चर्चांना उधाण
राज्यातील खातेवाटपानंतर आता साऱ्यांचं लक्ष पालकमंत्रिपद वाटपाकडे लागलं आहे. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोणाला पालकमंत्रिपद मिळणार, याची अनेकांना उत्सुकता आहे. याचदरम्यान, बीडचं पालकमंत्रिपद मंत्री धनंजय मुंडे यांना देऊ नये, अशी मागणी काही लोकांकडून केली जात आहे.
त्यामुळे बीडचे पालकमंत्री अजित पवार होणार का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक हास्य केलं. त्यामुळे राजकीय वर्तळात चर्चांना उधाण आलं आहे.
पुण्यातील रेसकोर्सवर आजपासून ‘नो युअर आर्मी’ प्रदर्शन सुरु झालं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रिपदावर भाष्य केलं. त्यानंतर फडणवीस यांना बीडच्या पालकमंत्रिपदाबाबत प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचक हास्य केलं.
‘नो युअर आर्मी’ प्रदर्शनाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आपला भारत देश मजबूत आहे. आमची सेना जगातील उत्तम सेना पैकी एक आहे. सेना कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याला निश्चितपणे परतावू शकते. देशावर हल्ला जमिनीवर होऊ द्या ,आकाशातून होऊ द्या किंवा पाण्यातून होऊ द्या. त्या हल्ल्याला परतवण्याचं सामर्थ्य भारतीय सैन्यामध्ये आहे. पुण्यात हे प्रदर्शन सुरू आहे, अतिशय आनंदाची गोष्ट आहे’.
भारतीय सैन्याची क्षमता आज आपल्याला येथे पाहायला मिळत आहे. डिफेन्स क्षेत्रामध्ये स्टार्टअपचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. पुण्यातील या प्रदर्शनाचा मूळ उद्धेश सामान्य जनतेला सैन्याचा जवळ आणणं असा आहे. भारताने नव्या क्षमता तयार केल्या आहेत. सेनेने वेगवेगळ्या प्रकारचे सुरक्षेचे हत्यार तयार केले आहेत. त्याचं प्रदर्शन या ठिकाणी आहे. मी सैन्य विभागाचं मनापासून अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले.
