
पंकजा मुंडेंनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट
संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडें याच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली.
राज्यामध्ये वेगाने घडामोडी घडत असताना पंकजा मुडें यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या विषयीचे वृत्त ‘साम टिव्ही’ने दिले आहे.
पंकजा मुंडे यांच्या भेटीचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र, मंत्रिपदी निवड झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतली होती.
पंकजा मुंडे यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील श्रीमान योगी हे पुस्तक तसेच संत भगवान बाबा यांची मूर्ती भेट दिली.
भुपेंद्र यादव यांची भेट
दिल्लीतील दौऱ्यात पंकजा मुंडे या केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांची देखील भेट घेतली. यादव हे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. पंकजा मुंडे यांनी ट्विट करत या भेटी विषयी माहिती दिली आहे. यादव यांचे आभार मानण्यासाठी त्यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे जीवन चरित्र श्रीमान योगी भेट दिले. तसेच त्यांनी महाराष्ट्रामधील सर्व विषयांवर संपूर्ण सहयोग करण्याचे आश्वासन या प्रसंगी दिले.’, असे मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
विधान परिषदेवर असताना मंत्रिपद
भाजपकडून विधानसभेवर विजयी झालेल्या आमदारांनाच मंत्रिपदाची संधी दिली जाते. मात्र, पंकजा मुंडे या त्याला अपवाद ठरल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली तसेच महाराष्ट्रात महायुतीची सत्ता परत आल्यानंतर त्यांना पर्यावरण मंत्रिपदी संधी दिली.