
आवादा कंपनीच्या दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याने तसेच खंडणीचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे.
मात्र जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत राजीनामा घेणार नसल्याचे अजित पवार यांनी सांगितल्याचे कळते.
धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची राळ उठलेली असताना आणि त्यांचा राजीनामा मागितला जात असताना अजित पवार यांचे मौनव्रत अनेकांना आश्चर्यचकित करणारे होते. मात्र अजित पवार परदेशात असल्याने त्यांनी याप्रकरणावर कोणतेही भाष्य केले नाही. दरम्यान अजित पवार दोन दिवसांपूर्वी परदेशातून आल्यानंतर बारामतीहून ते प्रथमच मुंबईत आले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास एक तास खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपांवर चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
जोपर्यंत दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा नाही
विरोधी पक्षातून तसेच सत्ताधारी पक्षातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे. परंतु दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे योग्य नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. खंडणी आणि खून प्रकरणात विविध आरोप होत आहे. राज्य सरकारने एसआयटी गठीत केली आहे. विशेष तपास समिती तपास करीत आहे. मात्र तपास सुरू असताना केवळ आरोप होत आहेत म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे हे योग्य होणार नाही, अशी अजित पवार यांची भूमिका असल्याचे कळते. याचाच अर्थ एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होणार नाही.
अजितदादांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांना काय सांगितले?
आपण दादांची भेट घेण्याकरिता गेला होतात, राजीनाम्यावर काही चर्चा झाली का? असे धनंजय मुंडे यांना विचारले असता, दादांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. आमच्या दोघांत राजीनाम्यावर शब्दानेही चर्चा झाली नाही, असे सांगत राजीनाम्याच्या चर्चांचे खंडन धनंजय मुंडे यांनी केले
विविध पक्षाच्या आमदारांनी बीडच्या प्रकरणावर एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशा मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमली आहे. तपास चालू आहे, तपास होऊ द्या. तपासानंतर ज्या गोष्टी समोर येतील, त्यानंतर ठरवू, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.