
आप,भाजपा आणि काँग्रेसची तिरंगी लढत कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा आज दुपारी २ वाजता केली जाणार आहे. आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत दिल्ली विधानसभा निवडणुकीची आणि निकालाची तारीख जाहीर केली जाईल.
७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारीला संपतो आहे. २०२० मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा ६ जानेवारीला झाली होती. आता आज निवडणूक आयोगाकडून कुठली तारीख जाहीर केली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार याबाबतची घोषणा करतील. १८ फेब्रुवारीला ते निवृत्त होणार आहेत.
अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून लढवार निवडणूक
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळीही नवी दिल्लीतून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांचा सामना काँग्रेसचे संदीप दीक्षित आणि भाजपच्या प्रवेश वर्मा यांच्याशी आहे. केजरीवाल मागच्या दोन निवडणुकीत इथूनच जिंकून विधानसभेत आले. नवी दिल्ली ही VIP सीट आहे. भाजप आणि काँग्रेस दोघांनी आपल्या स्टार नेत्यांना उतरवलं आहे. इथे सामना रंगतदार असणार आहे. मुख्यमंत्री आतिशी कालकाजीमधून विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्यांचा सामना काँग्रेसच्या अलका लांबा आणि दक्षिण दिल्लीचे माजी भाजप खासदार रमेश बिधूडी यांच्याशी आहे.
आप, काँग्रेस आणि भाजपा असा तिरंगी सामना
खरंतर आप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणूक एकत्र लढले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगळे झाल्याचं दिसून येतं आहे. अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांचा उल्लेख देशद्रोही असा केला होता. त्यानंतर या प्रकरणावरुन दिल्लीचं राजकारण तापलेलं पाहण्यास मिळालं. दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्या शीशमहल या घरावरुन मोदी आणि अमित शाह हे सातत्याने केजरीवालांवर टीका कत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार? हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे.
दिल्लीची लढाई का महत्त्वाची?
दिल्ली विधानसभेची निवडणूक आप या पक्षाने सलग दोनवेळा जिंकली आहे. भाजपाला ‘दिल्ली’ काबीज करायची आहे. त्यामुळे भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात तुरुंगात जावं लागल्याने त्यांनी आता लोक निवडून देतील तेव्हाच मी मुख्यमंत्री होईन असं म्हणत आतिशी यांना ते पद दिलं. या दरम्यान काँग्रेस आणि आप बरोबर आहेत असं वाटत असतानाच अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही म्हटलं. दोन्ही पक्षांमधला वाद विकोपाला गेल्याचं दिसून येतं आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीत नेमकं काय होणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.