
देशमुख खून प्रकरणाच्या दोन दिवस आधी आणि दोन दिवस नंतर किती घटना घडल्या?
संतोष देशमुख खून प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. विरोधकांसह सत्ताधारी पक्षाचे आमदार, नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. कारण खून प्रकरणाशी निगडीत असलेल्या खंडणीच्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल आहे.
मात्र अद्याप वाल्मिक कराडचं नाव खुनाच्या गुन्ह्यामध्ये आलेलं नाही.
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या प्रकणावर मौन पाळून असल्याचं दिसून येत होतं. मंगळवारी त्यांना सर्वच चर्चेतल्या मुद्द्यांवर थोडक्यात प्रतिक्रिया दिली. पर्यावरण विभागाशी संबंधित निर्णयाची माहिती देण्यासाठी पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी त्यांना बीडच्या प्रकरणाबद्दल विचारण्यात आलं.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, बीडमध्ये खरंच एवढी गुन्हेगारी वाढली आहे का, यावर मी नंतर सविस्तर बोलेन. कारण मी राज्यभर काम करत होते, त्यामुळे मला इतर भागातल्या परिस्थितीची जाण आहे. संतोष देशमुख यांचा खून अत्यंत निर्घृणपणे झालेला आहे. मारेकऱ्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. परंतु या प्रकरणाच्या दोन दिवस आधी आणि दोन दिवस नंतर किती घटना घडल्या, याकडे कुणाचंच लक्ष नाही.
पंकजा मुंडे यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातल्या अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. परंतु केवळ बीड जिल्ह्याला टार्गेट केलं जात आहे. असंच वादग्रस्त विधान मंत्री धनंजय मुंडे यांनीदेखील केलं होतं. राज्यातल्या इतर भागात अपहरण, खून होत नाहीत का? असं ते म्हणाले होते. त्यावरुन सुरेश धस कायम त्यांच्यावर टीका करत असतात.
पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याप्रमाणेच विधान केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संतोष देशमुख खून प्रकरणानंतर सर्वात आधी एसआयटीची मागणी मीच मुख्यमंत्र्यांकडे केली होती, त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्या कुटुंबाला घेऊन कुणी राजकारण करत असेल तर करु द्या, पण मला केवळ न्यायाची अपेक्षा आहे, असं त्या म्हणाल्या.