
आयुक्त म्हणाले, गेल्या निवडणुकीत…
दिल्ली विधानसभा निवडणुकांची आज निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
काय म्हणाले आयुक्त?
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, गेल्या निवडणुकीत गोंधळ घातला गेला की, आमचं हेलिकॉप्टर चेक केलं, त्यांचं केलं नाही. वाईट भाषा वापरली गेली. आम्ही संयम ठेवतो पण पोलिंग ऑफिसरला धमकी देण्यापर्यंत लोकांची मजल गेली. स्टार कँपेनर आहेत, त्यांनी शिष्टाचार आणि सभ्यता पाळावी. महिलांबाबत असभ्य वक्तव्य केलं तर आम्ही कठोर कारवाई करू, त्यामुळं सगळ्यांचं समान चेकिंग होणार, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांनी भूमिका मांडली.
महाराष्ट्रातील आक्षेपांवर दिलं उत्तर
सेक्टर मॅजिस्ट्रेट बूथवर जातात, ते ट्रेंड कलेक्ट करतात. साडे दहा लाख बूथवर कनेक्टेड नसलेल्या मशिन्सचा डेटा गोळा करणं शक्य आहे का? पाच ते सात या वेळेत प्रीसाइडिंग ऑफिसर रांगेत असलेल्या मतदारांना सांगतात तुमचे मतदान होईपर्यंत मतदान बंद होणार नाही. तेव्हा कधी कधी वादही होतो. मतदान संपवतात आणि मशिन, बॅटरी सील केली जाते. अनेक फॉर्म भरले जातात.
१७ सी भरल्यानंतर एजंटच्या हातात त्याची कॉपी दिली जाते. साडे दहा लाख बूथवर चार एजंट म्हटले तरी ४० लाख फॉर्म दिले जातात. महाराष्ट्रात १ लाख बूथ आहेत, तर एजंट्सना ४ लाख १७ सी फॉर्म दिले जातात. एका तासात ते फॉर्म बदलता येणं शक्य आहे का? प्रत्येक उमेदवार १७ सी फॉर्म त्यांच्या एजंटकडून गोळा करतात. त्यांना माहिती असतं कुठे किती मतदान झालंय? ६ वाजता मतदान संपल्यावर अर्ध्या तासात त्याची माहिती अपडेट होत नाही. जी माहिती अपडेट होते ती फॉर्म १७ सी वर दिलेली असते तशीच असते, कुणीही ते चेक करावं.
मतदानात आणि मतमोजणीतील मतांमध्ये फरक असल्याचं काहींनी म्हटलं. पण वोटर टर्नआऊटमध्ये पोस्टल मतदान नसतं हे त्यांना समजलंच नाही. एखादं मशिन सुरू झालं नाही, मशिन सुरू होण्यात चूक झाली, मॉक पोलचा डेटा हटवला गेला नाही असं अपवादाने घडतं. साडे दहा लाखात एक दोन मशिनला असं होऊ शकतं. मतमोजणी पूर्ण झाल्यावर विजयी उमेदवाराचं मताधिक्क्य त्या मशिनमध्ये असलेल्या मतांपेक्षा जास्त असेल तर त्या मशिनचा डेटा मोजला जात नाही, असंही यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.