
पंकजा मुंडे यांनी विरोधकांना सुनावले
संतोष देशमुखांच्या मुलांना घेऊन भाषण करण्यापेक्षा त्यांना न्याय मिळणे महत्वाचे आहे. फक्त यातून काहीतरी वेगळे मिळवण्याचा कुणीही प्रयत्न करु नये, अशा शब्दांत या विषयावर राजकारण करणाऱ्यांना पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी सुनावले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मागच्या महिन्यात क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा संशयित मास्टरमाईंड वाल्मिक कराड हा ३१ डिसेंबरला पोलिसांना शरण आला. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अत्यंत जवळचा माणूस आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली पाहिजे.
नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा दिला पाहिजे असंही विरोधक म्हणत आहेत. या प्रकरणावर प्रथमच सविस्तर पत्रकार परिषद घेऊन पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी या विषयावर राजकारण करणाऱ्यांना चांगलेच सुनावले. त्या म्हणाल्या, हत्या झाली तेव्हा मी तिथे उपस्थितीत होती का? तर मी एखाद्या व्यक्तीचे नाव घेऊन त्याच्यावर आरोप कसा करु? पण जो कुणी आरोपी असली त्याला शिक्षा झालीच पाहिजे. संतोष देशमुख माझा कार्यकर्ता होता. त्याच्या लेकराचा चेहरा पाहून मला काय वाटते आहे, याचे मोठे प्रदर्शन मांडण्याची आवश्यकता नाही. फक्त यातून काहीतरी वेगळे मिळवण्याचा कुणीही प्रयत्न करु नये.
गेली ५ वर्षांपासून मी राज्याच्या राजकारणापासून दूर आहे. मी मध्य प्रदेशची प्रभारी आहे. मी साधी आमदार, जिल्हा परिषद सदस्यही नाही. मग मी यामध्ये काय उत्तर देऊ? कोण कुणाचे अधिकारी आहेत, ते कुठून आलेत, हे मी कसे सांगू? तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी आणि तेव्हाच्या यंत्रणेनी ते आणलेत. ते देखील म्हणतात की, याचा तपास लागला पाहिजे, आरोपीचा शिक्षा झाली पाहिजे. त्यामुळे रोज याचा उल्लेख करणे माझ्या राजकीय उंचीला अपेक्षित नाही. माझ्या राजकीय जीवनात अशा कुठल्याही गोष्टीला स्थान नाही. ज्या दिवशी संतोष देशमुखला न्याय मिळेल तो दिवस माझ्यासाठी उज्ज्वल असेल.
महाराष्ट्रात याप्रकरणात एसआयटी लावण्यासाठी पहिल्यांदा मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे व्यक्त झाले. मी व्यक्त न होण्याचे काहीही कारण नाही, माझ्या जिल्ह्यात एका तरुणाची निघृण हत्या झाली. त्यावेळी मी व्यक्त झाले, असे सांगून मुंडे म्हणाल्या, राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा विश्वास आहे. त्यांनी विधानसभेत याप्रकरणाचा पूर्ण तपास करुन दोषींना शिक्षा देण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही, असे उत्तर दिले होते. या घटनेची चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करू असे जेव्हा माझे मुख्यमंत्री सांगतात त्यावेळी परत त्या विषयाला सतत चालू ठेवणे योग्य नाही.
आम्ही त्या तपासाबद्दल सकारात्मकत बाळगली पाहिजे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांनी विधानसभेत सांगितल्यानंतरही आम्ही मोर्चे काढणे म्हणजे अप्रत्यक्षपणे सरकारवरच प्रश्न उपस्थित करणे आहे. गृहमंत्री यात कुठल्याही प्रकारे कुचराई करणार नाही. माझ्या मनात पूर्ण विश्वास असल्यामुळे रोज रोज या विषयावर बोलावे, अशी माझी मानसिकता नाही. हा विषय धरून मला इश्यू करणे हा माझा स्वभाव नाही. माझ्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी शब्द दिला असताना आम्ही सारखे प्रश्न उपस्थित करत असू तर ते आमच्या नेतृत्वावर संशय घेण्यासारखे आहे,” असे त्या म्हणाल्या.
निर्घृण फक्त हत्या नसते तर आपला व्यवहारही निर्घृण असतो. एखादी वाईट घटना घडल्यानंतर त्यातून काहीतरी खाद्य मिळवणे चुकीचे आहे. एक भूमिका एकदा मांडली असताना रोज रोज माध्यमांपुढे तेच ते उगाळण्यात काय अर्थ आहे? त्यांच्याबाबतीत घडलेल्या घटनेचा आम्ही बाऊ करत त्याचा मंच तयार करून तिथे व्यक्त होण्याचे साधन बनवत आहोत, असे वाटते.