
धनंजय देशमुखांचा वकिलावर संताप; फोन कॉल व्हायरल
संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करावा आणि सर्व आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी एक याचिका दाखल करण्यात आलेली होती.
उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका मंगळवारी मागे घेण्यात आलेली आहे. त्याचं कारण स्पष्ट झालेलं नसताना एक फोनकॉल व्हायरल होत आहेत.
मृत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि हायकोर्टाचे वकील सोमनाथकुमार साळुंके यांचा कॉल व्हायरल झाला आहे. यामध्ये धनंजय देशमुख हे वकील सोमनाथकुमार साळुंकेंवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत. त्यावर साळुंके हे माफी मागत आहेत. साळुंकेंनी खोट्या सह्या करुन याचिका दाखल केल्याचा देशमुख यांचा आरोप आहेत.
देशमुख आणि साळुंके यांच्यातील संवाद
देशमुखः तुम्ही तसं का केलं? दाखल करण्यापूर्वी मला विचारायला पाहिजे होतं
साळुंकेः दाखल करताना अॅडजस्ट करण्यासाठी केलं
देशमुखः पण तुम्ही डुप्लिकेट सह्या का केल्या? दाखल करण्यापूर्वी मला दाखवलं का नाही?
साळुंकेः अॅडजस्ट करण्यासाठी केलं
देशमुखः अॅडजस्ट कशाला करता? चुकीच्या पद्धतीने दाखल करण्याचा हेतू काय?
साळुंकेः चूक झाली माझ्याकडून..
देशमुखः माफीचा विषय नाही, पण मी यावर काय बोलू
साळुंकेः तपासयंत्रणेला अडथळा नको म्हणून मागे घेतल्याचं सांगा
देशमुखः पण तुम्ही दाखल करायची नव्हती…
असा हा दोघांमधला संवाद व्हायरल झाला आहे. काही माध्यमांना प्रतिक्रिया देताना वकील साळुंकेंनी सांगितलं की, सदरील याचिका केवळ ई-फाईल केलेली होती, त्यामुळे ती मागे घेण्याचा प्रश्नच नाही. पुन्हा डिटेलमध्ये याचिका दाखल केली जाईल.