
मुख्यमंत्र्यांवरही साधला निशाणा
राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून कोकाटे म्हणाले की, शेतकऱ्यांमध्येच कर्जमाफी वरून दोन गट आहे त्यामुळे सरकार समोर अडचण निर्माण झाली असून कर्जमाफीची घोषणा करणारे त्याबाबत निर्णय घेतील असे सांगून त्यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर ते कार्यक्रमांमध्ये बोलताना म्हणाले की , शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यावरून दोन गट शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर आहे ते कर्जमाफीची मागणी करत आहे तर दुसरीकडे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे त्यामुळे सरकारने काय करावे असा प्रश्न सरकार समोर आहे. हा प्रस्ताव कॅबिनेट समोर मंजूर होईल. आमचे वरिष्ठ त्याबाबत निर्णय घेतील.पण हे सर्व बोलत असताना कोकाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वरती देखील निशाणा साधताना म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिलेले नाही याची आठवण मात्र त्यांनी करून दिली. एकूणच राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांची ही भूमिका हात झटकणारी असली तरी सरकारच्या अडचणीमध्ये भर टाकणारी नक्कीच आहे.
पहिल्यापासूनच माणिक कोकाटे हे परखड बोलणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर नाशिकमध्ये देखील कोणी एवढं गंभीर नसलं तरी त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्येच आता नाराजी पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वादाला सुरुवात होऊ शकते. त्यातच कोकाटे यांनी सरळ बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेचे समर्थन केले असले तरी महायुतीचे घटक असलेल्या भाजपाच्या नेतृत्वावरती निशाणा साधल्याने भाजप काय भूमिका घेते याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागले आहे.