
नाही तर, त्याच जगणं अवघड करेन,मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
संपूर्ण राज्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संताप उसळला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करावं, यासह इतर मागण्यांबाबत मस्साजोगच्या ग्रामस्थांसह धनंजय देशमुख यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
आता त्यांनी ग्रामस्थासह गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले असून पोलिसांनी टाकेकडे बंदोबस्त वाढवला आहे. तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासह दिवंगत देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील गावात दाखल झाले आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात होती. आता घटनेला महिना उलटून गेला असून एका आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला सोडून इतर 8 जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. यामुळे राज्यभरात वातावरण चांगलंच तापलं आहे.
तर मस्साजोगच्या ग्रामस्थांसह धनंजय देशमुख यांनी वाल्मिक याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करताना आज (ता.13) आंदोलन सुरू केले आहे. ते गावातील पाण्याच्या टाकीवर चढले असून पाण्याच्या टाकीला ग्रामस्थांनी वेढले आहे.
यावेळी मनोज जरांगे पाटील हे गावात दाखल झाले असून त्यांनी धनंजय देशमुख यांच्याशी फोनवर संवाद साधला. धनंजय देशमुख यांना टाकीवरुन खाली उतरण्याची विनंती केली आहे. मनोज जरांगे यांनी, तुमची समाजाला गरज असून समाज तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही खाली या, अशी विनंती केली आहे. तसेच जर तुम्हाला काय झालं तर त्याच जगणं अवघड करेन, असा इशारा धनंजय मुंडे यांना दिला आहे.
दरम्यान संतोष देशमुख यांना न्याय द्या या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून या कुटुंबाचा आधीच आधार हिरावला गेला आहे. आता काय बंधू धनंजय देशमुखसह कुटुंबाचा अंत पाहणार आहात का? असा सवाल सरकारला केला आहे.तर सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. ते धनंजय देशमुखांसह पाण्याच्या टाकीजवळ जमले आहेत. तसेच संतोष देशमुख यांना न्याय द्या अशा घोषणा करताना दिसत आहेत.