
मनोज जरांगेंचा मंत्री धनंजय मुंडेंना इशारा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले होते.
यावेळी ग्रामस्थांनीही पाण्याच्या टाकीला घेराव घातला होता. पोलिस प्रशासन आपल्याला या प्रकरणाची नीट माहिती देत नाही. माझा पोलिसांवर विश्वास नाही म्हणत धनंजय देशमुख यांनी जीवन संपवण्याचा प्रशासनाला इशारा दिला होता. यावेळी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारीही आंदोलनस्थळी दाखल झाले. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) यांनी टाकीवर चढून बसलेल्या धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यानंतर धनंजय देशमुख यांची मनधरणी करण्यात त्यांना यश आले. देशमुख पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांच्याशी बसून चर्चा केली. यावेळी जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. देशमुख कुटुंबाला धक्का लागला आणि तपास यंत्रणेचा गैरवापर होत असेल तर धनंजय मुंडे यांच्या टोळीचा आम्ही सामना करू. आमचा संयम सुटला तर अवघड होईल, अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे. आरोपींना पाठीशी घालणारे सुद्धा दोषी आहेत. भंगार आरोपी आणि त्यांची पिलावळ यांना का पोसता? अशी शंका यायला लागली आहे. जर आरोपी सुटले तर आम्ही त्यांचे जगणे मुश्कील करू आणि राज्य बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती का केली नाही?. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.
धनंजय देशमुख यांना दिला धीर
जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय… तुमची या कुटुंबाला गरज आहे. तुम्ही असा टोकाचा निर्णय घेऊ नका. न्याय द्यायची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही आत्महत्या करू नका. धनंजय देशमुख यांनी केलेल्या मागण्या त्या मनावर घेऊन त्यातून मार्ग काढायची प्रशासनाला विनंती आहे. प्रशासनाने आणि सरकारने आरोपी नव्हे तर देशमुख कुटुंबाला सांभाळायला हवे.