
केज नगरपंचायतीनं नेमकं काय केलं?
खंडणी व खुनाच्या आठवडाभरापूर्वी त्याने केजमध्ये वाईन शॉप उघडण्यासाठी प्रक्रिया केल्याचे समोर आले आहे.
बीड : सरपंच संतोष देशमुख यांची (Santosh Deshmukh Murder Case) निर्घृण हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणानंतर बीड जिल्हा राज्यात चर्चेत आहे.
या सर्वांच्या केंद्रस्थानी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंचा (Dhananjay Munde) निकटवर्तीय वाल्मिक कराड (Valmik Karad) आहे. कराडवर खंडणीचा गुन्हा नोंद झाल्यानंतर ‘समाजसेवक’ म्हणून त्याचे समर्थनही केले जात आहे.
परंतु, खंडणी व खुनाच्या आठवडाभरापूर्वी त्याने केजमध्ये वाईन शॉप उघडण्यासाठी प्रक्रिया केल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वाल्मिक कराडला वॉईन शॉपचा परवाना (Wine Shop License) दिला असून त्यानंतर त्याला केज नगर पंचायतीने (Kaij Nagar Panchayat) ना हरकत प्रमाणपत्रही दिले आहे.
वाल्मिक कराडला धनंजय मुंडे यांनी कार्यकारी पालकमंत्री म्हणून सर्व अधिकार दिल्याचा आरोप त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केला. भाजप आमदार सुरेश धस यांचेही तेच आरोप आहेत. कराडने जिल्हा नासविल्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे म्हणणे आहे. मात्र, मुंडेंच्या घरी घरकाम ते जिल्ह्याच्या यंत्रणांवर हुकूमत अशी त्याची वाटचाल सर्वश्रुत आहे.
त्याच्या मालत्तेची ‘कोटी’ची उड्डाणेही समोर आली आहेत. परळीतील अनेक उत्पादनांच्या एजन्सी त्याच्या नावे आहेत. त्याच्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी परळी सोडल्याचा आरोपही सुरेश धसांनी केला. दरम्यान, गंभीर गुन्हे असताना त्याला दोन पोलिस अंगरक्षक होते, तसेच त्याला अग्नीशस्त्र परवानाही आहे. मात्र, ‘समाजसेवक’ अशी त्याच्या समर्थकांनी त्याची प्रतिमा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्याने केजमध्ये वाईन शॉप उघडण्यासाठी परवाना काढला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी वाल्मिक बाबूराव कराड याच्या नावाने मंजूर केलेल्या वाईन शॉप परवान्यानंतर त्याला केजमध्ये दारु दुकान उघडण्यासाठी केज नगर पंचायतीने ना हरकत प्रमाणपत्र देखील दिले आहे. विशेष म्हणजे, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आठवड्यापूर्वीच (ता. दोन डिसेंबर २०२४) ही प्रक्रिया झालेली आहे. संतोष देशमुख यांची हत्या ता. नऊ डिसेंबरला झाली तर वाल्मिक कराडवर ता. ११ डिसेंबरला खंडणीचा गुन्हा नेांद झाला.
ना हरकत रद्द करण्याची मागणी
दरम्यान, केज नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सचिन देशपांडे यांनी ता. दोन डिसेंबरला त्याला वाईन शॉपसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले. नियोजित जागेची खरेदी झालेली नसताना ना हरकत दिल्याचा आरोप मोहन गुंड यांनी केला. याबाबत नगर पंचायतीच्या लोकप्रतिनिधींनाही माहित नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
केजमध्ये व्यसनाधिनता, चोऱ्या, मारामारीचे प्रमाण वाढलेले असताना नव्याने ना हरकत कशी, असा सवाल करण्यात आला. निवेदन देताना श्री. गुंड यांच्यासह अरविंद थोरात, संदीप नाईकवाडे, अशोक रोडे, सूरज शेंडगे, प्रशांत गुंड, विजय चाळक, विशाल तपासे, वैभव चाळक राजेभाऊ गुंड, अक्षय तपसे उपस्थित होते.