वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर बायको खवळली
वाल्मिक कराड याच्यावर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवून ‘मकोका’न्वये कारवाईचे पाऊल राज्य सरकारने उचलल्यानंतर त्याच्या बायकोने अतिशय आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणात निव्वळ जातीयवाद होत आहे. कोणतेही पुरावे नसताना त्यांच्यावर (वाल्मिक कराड) केवळ दबावातून कारवाई केली जात आहे. हे अतिशय अयोग्य आहे, असे वाल्मिक कराडच्या पत्नीने म्हटले.
वाल्मिक कराडची पोलीस कोठडी संपल्याने त्याला केज न्यायालयासमोर मंगळवारी हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र एसआयटीच्या तपास अधिकाऱ्यांनी वाल्मिकचा खून प्रकरणात आणि कटात सहभाग असल्याचा ठपका ठेवला. खून प्रकरणात त्याची चौकशी होणे गरजेचे आहे, अटकेत असलेल्या इतर आरोपींकडून महत्त्वाची माहिती आम्हाला मिळाली आहे, असे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. खून प्रकरणात एसआयटीने वाल्मिकच्या चौकशीसाठी त्याचा ताबा मागितलेला आहे. जसेही वाल्मिकवर मकोका लागल्याची बातमी परळीत पसरली, तसे कराड समर्थक प्रचंड आक्रमक झालेले होते. वाल्मिकची पत्नी, आई आणि नातेवाईकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर त्यांची बायको काय म्हणाली?
त्यांचा (वाल्मिक कराड ) खंडणी आणि खून प्रकरणात कुठलाही सहभाग नाही पण आंदोलन आणि वेठीस धरून गुन्हा दाखल होणार असतील तर हे प्रकार चांगले नाहीत. जाणून बुजून कारवाई करायला लावणार असतील तरे हे थांबले पाहिजे.
पोलीस आणि सरकार अशी कारवाई कशामुळे करतंय, असे विचारले असता त्या म्हणाल्या- पूर्णपणे या प्रकरणात जातीयवाद केला जातोय. जातीवादाशिवाय दुसरा काहीही विषय नाही. गुन्हेगाराला जात नसते. पोलिसांना तपास करायचा असल्यास करावा पण जात मध्ये आणून तुम्ही काय साध्य करताय. ते दोषी नाहीयेत, अशी बाजू वाल्मिक कराडच्या पत्नीने माध्यमांसमोर मांडली.
परळी बंदवर बोलताना वाल्मिकच्या पत्नी म्हणाल्या….
परळी बंदवर बोलताना वाल्मिकच्या पत्नी म्हणाल्या, जर जातीयवादातून त्यांच्यावर मकोका लावण्यात आला असेल तर लोक परळी बंदमध्ये उतरतीलच ना….
वाल्मिक कराडचे वकील काय म्हणाले?
सरकारी वकिलांनी वाल्मिक कराड यांची १० दिवसांची पोलीस कोठडी पाहिजे, अशी मागणी केली होती. ज्यावेळी पहिल्यांदा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते, त्यावेळी जे मुद्दे सांगून पोलीस कोठडी घेतली, तेच मुद्दे आताही सांगून पोलीस कोठडी मागितली गेली. परंतु न्यायालयाने सरकारी वकिलांना फटकारून त्यांची पोलीस कोठडी न देता त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. त्यांच्यावर तूर्त तरी मकोका लागलेला नाही, असे वाल्मिकच्या वकिलांनी सांगितले.
