तुझ्या जिद्दाला एक आजोबा…
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष आणि देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार हे मागील अनेक दशकांपासून राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे शरद पवार हे सोशल मीडियावरही सक्रीय असतात.
आपली भाषणे, आठवणी सोशल मीडियावर मांडणाऱ्या शरद पवार यांनी आपल्या लाडक्या नातवासाठी खास पोस्ट लिहिली आहे.
शरद पवार यांनी आपली लेक आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे चिरंजीव विजय सुळे याच्यासाठी एक खास पोस्ट केली आहे. विजय सुळे याचा आज वाढदिवस असून शरद पवारांनी आजोबा म्हणून आपल्या खास शब्दात विजय याला शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांनी वाढदिवसाच्या पोस्टसह विजय आणि प्रतिभा पवार यांच्यासह एक फोटो पोस्ट केला आहे. शरद पवार यांच्याकडून सहसा कौटुंबिक पोस्ट केल्या जात नाहीत. मात्र, विजयबाबत फोटोसह त्यांनी शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली आहे.
शरद पवार यांनी काय म्हटले?
शरद पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले की, आयुष्याच्या प्रत्येक वळणाचा योग्य मार्गाने अनुभव घेत त्यात यश संपादित करण्याची तुझी चाललेली धडपड ही सदैव अशीच सुरु राहो. ज्या क्षेत्रात तुला आवड आहे त्यामध्ये उत्तुंग भरारी घेण्याऱ्या तुझ्या जिद्दाला एक आजोबा म्हणून नेहमीच पाठबळ राहील, असे आश्वासन देताना शरद पवारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
व्हिडीओत दिसलंय आजोबा-नातवाचे बाँडिंग
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती आणि मुलगा विजय यांच्यातील आजोबा-नातवंडाचे नाते याआधीदेखील दिसून आले आहे. सुप्रिया सुळे यांच्या व्हिडीओ पोस्टच्या माध्यमातून आजोबा शरद पवार आणि नातू विजय यांच्यातील खास बाँडिंग दिसून आले. एका व्हिडीओत नुकतंच ड्रायव्हिंग लायसन्स मिळालेल्या विजयने आजोबा शरद पवारांना कारमध्ये बसवून फिरवून आणले होते. या व्हिडीओत पवार हे विजयला काही ड्रायव्हिंग टीप्स देताना दिसून आले होते.
