
फडणवीसांचं कौतुक करत जरांगे बरंच बोलले!
संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराड याच्यावर ही कारवाई झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक करताना मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मात्र निशाणा साधला आहे.
जनता फडणवीसांकडे न्याय मागत होती
‘मकोका आणि हत्येचा गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं, गरजेचं होतं. खूप आक्रोश होता, शेवटी जनभावना महत्त्वाची. राज्यातली जनता मुख्यमंत्री फडणवीसांकडे न्याय मागत होती. खंडणी आणि खुनातले आरोपी एकच आहेत. यांची आणखी एक टोळी आहे, यांच्या वेगवेगळ्या टीम आहेत. खंडणी, खून करणारी दुसरी टीम आहे. छेडछाडी करायच्या, बलात्कार करायचा, दरोडे टाकायचे, अशी एक टीम आहे. घर, जागा जमिनी बळकवायची अशी टीम आहे. या टीमना सांभाळणारा एक आहे’, असं जरांगे म्हणाले आहेत.
धनंजय मुंडेची टोळी
‘संघटित गुन्हेगारी करणारी धनंजय मुंडेची ही टोळी आहे. हिचा सफाया करणं मुख्यमंत्री साहेबांना गरजेचं आहे, तुम्ही मागे हटू नका. तो सरकार चालवत नाही, याचा नायनाट मुळासकट बिमोड करा. या आरोपींना पोसणाऱ्या टीमना सहआरोपी करा. यांना जन्मठेप-फाशीच झाली पाहिजे. या १००-१५० जणांनी राज्य वेठीस धरलं आहे. यांच्या पाठीराख्याची नार्को टेस्ट करा’, अशी मागणी जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुंडेच्या टोळीने जातीची पत घालवली
ती जात चांगली आहे, पण धनंजय मुंडेच्या गुंडाच्या टोळीने जातीची पत घालवून टाकली आहे, त्यांच्यावर खाली मान घालून चालवायची वेळ आणली. मी मुख्यमंत्री साहेबांचं कौतुक करतो, पण तपासात पुढे घोळ व्हायला नको. याच्यातला एकही आरोपी सुटता कामा नये. या टोळीला पैशासाठी जात-पात कळत नाही, यांचा माज आणि मगरुरी उतरवली पाहिजे. धनंजय मुंडेनी ही टोळी तयारी केली आहे. आरोपीला पाठिंबा देतात, सोडण्यासाठी सांगतात’, अशी टीका जरांगेंनी केली आहे.
रावणही टिकला नाही
‘धनंजय मुंडेला खूप मोठा भ्रम होता, मी म्हणजे अमृत पिऊन आलो आहे. राज्यात माझी लोक मगरुरी करणार, माज करणार, माझं कुणी काही करू शकत नाही. अरे रावणाचं टिकलं नाही, तू कोण आहे?’, असा निशाणा मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंना विचारला आहे.