
अण्णा हजारे,सरकारने योग्य नियोजन करणे काळाची गरज
देशात सध्या गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही वाढती विषमता समाजाला व देशाला घातक आहे. त्यावर सरकारने योग्य नियोजन करणे काळाची गरज आहे. तसे झाले नाही, तर भविष्यात समाजाला यातून मोठे धोके निर्माण होऊ शकतात, अशी भीती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आदर्श गाव योजनेचे राज्याचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार व पिंपळनेरचे सरपंच देवेंद्र लटांबळे यांच्याशी बोलताना व्यक्त केली.
पवार यांनी हजारे यांची भेट घेतली. त्यावेळी त्या दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. हजारे म्हणाले, समाजात मोठी आर्थिक विषमता वाढत आहे, ती कमी करण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक आहे. मानवतावाद व निसर्ग यांची सांगड घालून समाजाचे आपण काही तरी देणे लागतो याचा विचार करून आपण समाजासाठी काम केले पाहिजे.
मी माझ्यासाठी काहीच ठेवले नाही, त्यामुळे मी आणि माझे ही भावना आता माझी राहिली नाही. अर्थात प्रत्येकाला माझ्यासारखे वागता येणार नाही, तरीही आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने प्रत्येकाने समाजासाठी योगदान दिले पाहिजे. निसर्गाने समाजाला भरपूर दिले; मात्र त्याचा वापर योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. निसर्गाच्या विध्वंसातून मानवाचे मोठे नुकसान होणार आहे.
त्यासाठी नैसर्गिक साधन सामग्रीची होत असलेली हानी कमीत कमी कशी होईल व नैसर्गिक साधन सामग्रीचे जास्तीत जास्त जतन कसे करता येईल याचे भान नागरिकांनी ठेवले पाहिजे. राळेगणसिद्धी व हिवरेबाजार ही दोन गावे आदर्श झाली म्हणजे राज्य किंवा देश आदर्श होत नाही. यासाठी या गावांचा गुणाकार होणे गरजेचे आहे; मात्र प्रत्यक्षात तसे घडताना दिसेनाही ही खेदाची बाब आहे, असे ते म्हणाले.
मला मिळालेल्या सुमारे एक कोटी ७० लाख रुपयांचा बक्षिसांचा सार्वजनिक ट्रस्ट केला. त्यातील एक पैही माझ्यासाठी खर्च करत नाही. ते समाजाने मला दिले, ते समाजाचे आहे व समाजासाठी खर्च करत आहे.
नैसर्गिक साधन संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत आहे. त्याला आळा घालणे गरजेचे आहे. नैसर्गिक साधन संपत्ती दिवसेंदिवस कमी होत आहे. दररोज लाखो टन लोखंड, तसेच इतरही खनिजांचे उत्खनन सुरू आहे. एक दिवस ही खनिज संपत्ती संपणार आहे, हा मोठा धोका आहे.