
बजरंग सोनावणे यांचा सवाल
बीड येथील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकारण चांगलं तापलं आहे. या प्रकरणांमध्ये बहुतांश आरोपींना पकडण्यात आलं असून मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेल्या वाल्मीक कराड याला देखील मकोका लावण्यात आला आहे.
वाल्मीक कराड याला मकोका लावल्यानंतर परळीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत बोलताना बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना बजरंग सोनवणे म्हणाले, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी वाल्मीक कराड यांच्यावर दोषारोप पत्र ठेवला आहे. गुन्ह्यातील संबंधित असलेल्या लोकांना त्याने फोन केला आहे. त्यामुळे न्यायालयाने त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी दिली असल्याचं बजरंग सोनवणे म्हणाले.
परळी येथे अद्यापही उग्र स्वरूपाची आंदोलन करण्यात येत आहेत. याबाबत बोलताना बजरंग सोनावणे म्हणाले, परळीचे लोकप्रतिनिधी म्हणून धनंजय मुंडे यांची देखील लोकांना समजावण्याची जबाबदारी आहे. तसाच बीडचा खासदार म्हणून मी देखील लोकांना शांत राहण्याचा जाहीर आवाहन करत आहे. मात्र जे कोणी आंदोलन करत आहेत ते जनतेतील लोकांना नसून यांचेच साथीदार असल्याचा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला.
परळी येथील तणावपूर्ण परिस्थितीबाबत मंत्री पंकजा मुंडे यांना विचारला असता त्यांनी याबाबत आपल्याला अधिकची माहिती नसून आपण कामात व्यस्त असल्याचे सांगितलं होतं. याबाबत बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, त्या पाच वर्ष कामातून बाजूला होत्या आता त्या कामात लागलेल्या असतील त्यामुळे त्यांना परळीच्या परिस्थितीबाबत माहिती नसेल असा खोचक टोला त्यांनी पंकजा मुंडे यांना लगावला.
बजरंग सोनवणे पुढे म्हणाले, कुणीतरी म्हणालं की परळीला एक वेगळ्या राज्याचा दर्जा द्या आणि मुख्यमंत्री करा. कदाचित पंकजा मुंडे यांना परळी हे आपल्या राज्याचा भाग नसल्याचा वाटत असेल त्यामुळे परळी बाबत त्यांना अधिक माहिती नसेल असा टोला सोनवणे यांनी लगावला.
परळी आणि बीडमध्ये काय परिस्थिती आहे. हे राज्यातील लहान मुलाला देखील माहिती आहे. परंतु पंकजा मुंडे जर मला याबाबत माहित नाही असं म्हणत असतील तर ही गोष्ट लोकप्रतिनिधीला शोभणारी नाही. आपण त्या भागाचे प्रतिनिधित्व करत असल्याने जबाबदारी झटकून चालणार नाही बीड आणि परळी शांत ठेवण्याची जबाबदारी आपली असल्याचं बजरंग सोनवणे म्हणाले.