
विधानसभा निवडणुकांमध्ये अजित पवार गटाला मोठे यश मिळाल्यावर त्यांचे नेते शरद पवार पवार गटाला सुनावण्याची एकही संधी सोडत नाहीत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तर बारामतीत जाहीर कार्यक्रमात थेट शरद पवारांना चिमटा काढला
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे तोंडभरून कौतुक केले.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. मंत्रिपदाची अपेक्षा नसताना दादांनी आपल्याला कृषी मंत्री केल्याचे सांगताना कोकाटे यांनी दादांना जे कळतं ते कुणालाच कळत नाही, असे विधान केले.
कृषी विज्ञान केंद्रातर्फे बारामतीमध्ये आयोजित कृषिक कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठीवर शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, अॅग्रिकल्चिर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, ट्रस्टचे विश्वस्त व सकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार आदी यावेळी उपस्थित होते.
कोकाटे यांनी मंत्रिपदाबाबत भाष्य केले. ते म्हणाले, दादा मला कृषी खाते देतील, अशी अपेक्षा नव्हती. मी मंत्रिपदही मागितलं नाही, खातंही मागितलं नाही. पण दादांना जे कळतं ते कुणालाच कळत नाही, असं मला वाटायला लागलं आहे. एवढं हुशार व्यक्तिमत्व बारामतीत आहे.
रस्ते, प्लॅनिंग… जणू सिंगापूरमध्ये आल्यासारखं वाटतं. इतकं सुंदर शहर दादांनी नटवलं आहे. त्यांच्याच अवलोकन करण्याचा प्रयत्न राजकारणात आमच्यासारख्या लोकांनी केला पाहिजे. आपला स्वार्थ जनतेच्या हितामध्ये आहे. जनतेला सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यासाठीच आपण राजकारण करतो. तीच भूमिका घेऊन आमच्या सर्वांची इच्छा आहे, असे कोकाटे यांनी सांगितले.