
म्हणाले, लवकरच त्यांची…
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत.
संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यातच गुरुवारी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. दोघांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा देखील झाली. यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
धनंजय देशमुख म्हणाले की, या घटनेत उज्वल निकम यांची नियुक्ती झाली पाहिजे. आमच्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती हवी. मुख्यमंत्री आणि उज्वल निकम यांची भेट झाली आहे. लवकरच देवेंद्र फडणवीस हे त्यांची नियुक्ती करतील, असे वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
त्या’ सर्वांना आरोपी करून अटक केली पाहिजे
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. हे आरोपी किती गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे लक्षात येते. या गुन्हेगारांवर त्याचवेळी कारवाई केली असती तर या घटना घडल्या नसत्या. कृष्णा आंधळेला शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. या घटनेतील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला पकडले पाहिजे. तर या सर्वांना कुणी आसरा दिला त्यांचे कोणाशी बोलणे झाले, पैसे पाठवले त्या सर्वांना यात आरोपी करून अटक केली पाहिजे, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले.
धनंजय देशमुख आज जबाब नोंदविणार नाही
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचे भाऊ धनंजय देशमुख आज केज न्यायालयात जबाब नोंदविणार होते. मात्र प्रकृती अस्वस्थतामुळे धनंजय देशमुख आज केज न्यायालयात जाणार नाही. याबाबत धनंजय देशमुख म्हणाले की, 26 डिसेंबर रोजी माझा जबाब झालेला आहे. मात्र न्यायालयात 64 ब नुसार पुन्हा जबाब दिला जातो. तो देण्यासाठी मी आज जाणार होतो. मात्र प्रकृती ठीक नसल्याने आणि मानसिक स्थिती योग्य नसल्याने उपचार घेणार आहे. त्यामुळे मी आज जबाब द्यायला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.