
बीडमधील मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. या हत्या प्रकरणाचे पडसाद संसदेतदेखील पाहायला मिळाले. या हत्येप्रकरणी आत्तापर्यंत वाल्मिक कराडसह एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून कृष्णा आंधळे हा एक आरोपी अद्यापही फरार आहे.
बीड पोलिस, सीआयडी, एसआयटी अशा विविध यंत्रणांकडून या हत्येप्रकरणाचा तपास सुरू आहे.
पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांची नियुक्ती
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संसदेत मोठ्या प्रमाणात गाजले. अपहरण, कोंडी,यांसारख्या घटनांमुळे बीडचा बिहार झाल्याची टीका करण्यात आली. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचा ठपका ठेवण्यात आला. या आरोपांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बीडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी करत त्या ठिकाणी धडाकेबाज,शिस्तप्रिय आयपीएस अधिकारी नवनीत काँवत यांची नियुक्ती केली.
नवनीत काँवत यांनी बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ठोस पावले उचलली असतानात पोलिस प्रशासनातही शिस्तीचा बडगा उगारला आहे. बीडमध्ये पोलिस अधिक्षक काँवत यांनी जिल्ह्यात जातीयवाद कमी करण्यासाठी पोलिसांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. हा पोलिसांसाठी मोठा इशाराही मानला जात आहे. त्यांनी 3 मोठे निर्णय निर्णय घेतले आहेत.
कोणते निर्णय घेतले?
1) बीड पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांशी पोलिस ठाण्यात किंवा ड्युटीवर असताना संवाद साधताना आडनावाऐवजी थेट नावाने हाक मारावी असे आदेश दिले आहेत.
2) ड्युटीवर असताना रील्स काढू नये, तसेच ते सोशल मीडियावर शेअरही करु नये. अन्यथा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
3) पोलिस ठाण्यात लाचप्रकरणी एसीबीची कारवाई झाली,तर संबंधित पोलिस ठाणेप्रमुखाची थेट नियंत्रण कक्षात ट्रान्सफर करण्यात येणार आहे.
आरोपींना न्यायालयीन कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना आज शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. आरोपींना पुन्हा तपासासाठी पीसीआर देण्याच्या अटीवर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे.या प्रकरणातील सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे.
तर, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांच्या जामीन अर्जावर 20 जानेवारी रोजी सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे.आरोपीच्या वकिलाने पुढील तारीख मागितल्याने न्यायालयाने त्यांना पुढची तारीख दिली आहे.