वसमत प्रतिनिधी बालाजी अडकिने
“आजपासून दारू बंद!” असा निर्धार अनेक जण करतात; पण दुसऱ्याच दिवशी तो मोडतो. दारूच्या व्यसनामुळे कुटुंबात कलह, आर्थिक अडचणी आणि मानसिक ताण वाढत असताना वसमत येथे Alcoholics Anonymous (AA) गटाने पुढाकार घेत मोफत व्यसनमुक्ती सभा सुरू केल्या आहेत.
या सभा दर रविवारी सकाळी १०.३० ते १२.०० या वेळेत अहिल्यादेवी कन्या विद्यालय, बँक कॉलनी, वसमत येथे होत असून सर्वांसाठी खुल्या व विनामूल्य आहेत.AA गटामध्ये दारू सोडण्याची प्रक्रिया ही एका दिवसात होत नाही, तर “एक दिवस एकावेळी” या तत्त्वावर केली जाते. सभेमध्ये व्यक्ती स्वतःची समस्या मान्य करते, इतरांचे अनुभव ऐकते आणि स्वतःचे मन मोकळे करते.
एका ४० वर्षीय व्यक्तीला दारूमुळे नोकरी आणि कुटुंब दोन्ही धोक्यात आले होते. सुरुवातीला “मी कधीच सोडू शकत नाही” अशी त्याची भावना होती. मात्र AA सभांना नियमित उपस्थित राहून त्याने दररोज सकाळी स्वतःला एकच वचन दिले – “आजचा दिवस मी दारू पिणार नाही.”
काही महिन्यांतच त्याने पूर्णपणे व्यसनमुक्ती मिळवली. आज तोच व्यक्ती इतरांना धीर देत आहे.
दारूमुळे वाढणारे अपघात, कौटुंबिक तणाव आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. “एकता, सेवा आणि मुक्तता” या तत्त्वावर आधारित AA गट गोपनीयता राखून मार्गदर्शन करतो.दारूच्या व्यसनातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या सभांना उपस्थित राहून नव्या आयुष्याची सुरुवात करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
