जेजुरी प्रतिनिधी : संदिप रोमण
पुरंदर जेजुरी —दि. 16 फेब्रुवारी जेजुरी नगरपरिषदेच्या कथित भ्रष्टाचार, निकृष्ट कामे व अनियमित कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते तानाजी पोपटऱाव भालेकर यांनी सोमवार दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या उपोषणामागे नगरपरिषद क्षेत्रातील विविध गंभीर प्रश्न असून, प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भालेकर यांनी मांडलेल्या मागण्यांमध्ये, जेजुरी महार वतन इनाम वर्ग ब (०६) गट नं. १३६ येथील बेकारादेशीर व अनधिकृत बांधकामे तातडीने निष्कासित करण्याची मागणी आहे. तसेच जेजुरी आनंदनगर परिसरात दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत करण्यात आलेल्या समाज मंदिर दुरुस्ती व विकास कामे, रस्ते, भूमिगत गटारे व शौचालयांची कामे चुकीच्या पद्धतीने व निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व कामांची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच महार वतन इनाममधील तसेच मल्हार हिल्स शेजारील घनकचरा प्रक्रिया ठेका व इतर कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नगरपरिषद प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्यास आमरण उपोषणास सुरुवात करण्यात येईल, असा इशाराही भालेकर यांनी दिला आहे. या उपोषणामुळे जेजुरी शहरातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडण्याची शक्यता आहे
