
आपल्या निर्णयावर एरवी ठाम राहणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची तात्काळ दखल घेत रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यामागे दिल्लीचा हस्तक्षेप कारणीभूत ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
फडणवीस यांनी दावोसला रवाना होण्यापूर्वी शनिवारी रात्री पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यात रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. रायगडचे पालकमंत्रीपद चांगलेच वादग्रस्त ठरले. आदिती तटकरे नको अशी जाहीर भूमिका शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांनी घेतली होती. तटकरे यांची नियुक्ती होताच रायगडमध्ये हिंसक प्रतिक्रिया उमटली. रास्ता रोको करण्यात आला. टायर्स पेटवून देण्यात आले. भरत गोगावले यांनी रायगड पालकमंत्रीपदासाठी जाहीरपणे वक्तव्य केले होते. तटकरे यांची नियुक्ती झाल्याने गोगावले यांची पार नाचक्की झाली. दुसरे म्हणजे त्यांची कोणत्याची जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली नव्हती. नाशिकमध्ये शिवसेनेच्या दादा भुसे यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्याची शिवसेनेची मागणी होती. पण या जिल्ह्यात मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती.
सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाला एकापाठोपाठ एक धक्के दिले होते. शिंदे गटाच्या काही मंत्र्यांची नियुक्ती फडणवीस यांच्यामुळे झाल्याची चर्चा होती. शिंदे यांना गृह खाते देण्यासही विरोध झाला होता. एस. टी. बस खरेदीची निविदा रद्द करण्यात आली. सिडकोच्या अध्यक्षपदावरून शिंदे यांचे विश्वासून संजय शिरसाट यांची उचलबांगडी करण्यात आली. याशिवाय छोटे-मोठे अनेक निर्णय बदलण्यात आले. यामुळे शिंदे गटात अस्वस्थता होती. पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवरून शिंदे गटाला मोठा धक्काच दिला.
या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी ही बाब फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली. याशिवाय शिंदे यांनी दिल्लीतील भाजप नेत्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. यानंतरच फडणवीस यांनी दावोस दौऱ्यावर असताना सामान्य प्रशासन विभागाला रायगड व नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्याचा आदेश दिला. त्यानुसार रविवारी सुट्टी असतानाही रात्री दहाच्या सुमारास सामान्य प्रशासन विभागाने स्थगिती आदेश जारी केला.