प्रतिनिधी स्वाती हडकर
नॅशनल हायस्कूल हर्णै येथे दरवर्षीप्रमाणे इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकडून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ‘सूरह फातिहा’च्या तिलावतीने झाली. मोहम्मद कैफ महालदार, हसनैन सोलकर, तहा काजी व सिद्दिक सुरा यांनी कुरआन पठण करून त्याचा उर्दू, मराठी व इंग्रजी भाषेत अर्थ सांगितला. त्यानंतर तहरीन पंतावे यांनी सादर केलेल्या नात-ए-पाकने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
आलेले मान्यवरांचे स्वागत इयत्ता नववीचे वर्गशिक्षक मुबीन बामणे यांच्या सूत्रसंचालनाखाली मुख्याध्यापक आसिफ भाटकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले.
वार्षिक क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मॉडेल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला रंगीत प्रिंटर भेट दिला. इयत्ता दहावीतील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून मुलांमधून अहमद बामणे तर मुलींमधून आयेशा काजी यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजीद महालदार यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन दोन्ही विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
नववीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले, तर दहावीच्या विद्यार्थ्यांनी आठवणींना उजाळा देताना भावनिक क्षण अनुभवले. मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेसाठी शुभेच्छा देत शाळेचे नाव उज्ज्वल करण्याचा सल्ला दिला.
