प्रतिनिधी /फुलसावंगी
निसर्ग संवर्धनाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्यांच्याच ‘कमालीच्या’ दुर्लक्षामुळे गुरुवारी निसर्गाचे अपरिमित नुकसान झाले आहे. अमडापूर बीट अंतर्गत येणाऱ्या नारळी येथील शासकीय रोपवनाला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत जवळपास चार हेक्टरमधील हजारो रोपे जळून कोळसा झाली असून, शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, ही आग ‘नैसर्गिक’ नसून वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे लागल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे.
येणाऱ्या पावसाळ्यात वृक्षारोपणासाठी नारळी येथील रोपवनात सागवान, चिंच, करंज, लिंब, मोहा आणि बेडा यांसारख्या विविध प्रजातींची हजारो रोपे अतिशय मेहनतीने तयार करण्यात आली होती. गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक आग लागली. रोपवनाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘फायर लाईन’ वेळेवर साफ न केल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. पाहता पाहता संपूर्ण रोपवन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
या आगीत केवळ रोपेच जळाली नाहीत, तर रोपवना साठी वापरण्यात आलेले महागडे नेट, साठवून ठेवलेली महागडी खते.
इतर तांत्रिक साहित्य आणि साहित्याची पूर्णतः राख झाली आहे. “पगार घेता मग गस्त का नाही?” स्थानिक नागरिकांच्या मते, वनविभागाचे अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. फिल्डवर गस्त घालण्याऐवजी कागदोपत्री कामे उरकण्यावर त्यांचा भर असतो. जर कर्मचारी कर्तव्यावर असते, तर सुरुवातीच्या काळातच ही आग विझवता आली असती. “कडाक्याच्या उन्हात रात्रंदिवस मेहनत करून वाढवलेली ही रोपे कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे डोळ्यादेखत जळून गेली,” अशी संतप्त भावना निसर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे. फायर लाईन का काढली नव्हती? त्यासाठीचा निधी कुठे गेला? घटनेच्या वेळी कर्तव्यावर असलेले कर्मचारी कुठे होते? वरिष्ठ अधिकारी या गंभीर घटनेची दखल घेणार का? या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी वनपाल आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी फुलसावंगी परिसरातून होत आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
—******————______
मी तुम्हाला थोड्या वेळात बोलतो मी बाहेर आहे.
▪️ए.एस.चहानकर
क्षेत्रसहायक
*______******_____******
नारळी येथे रोपवन आहे परंतु ते जळल्याबद्दल मला काही माहिती नाही माहिती घेऊन सांगतो.
▪️ देवेंद्र मुनेश्वर
वनपरिक्षेत्र अधिकारी, महागाव
