देहूगांव प्रतिनिधी ,बद्रीनारायण घुगे
: संत परंपरेने समाजाला कर्मयोगाचा मार्ग दाखवला असताना आजचा समाज कर्मयोगापेक्षा कर्मकांडाला अधिक प्राधान्य देत असल्याची खंत हभप संतोष महाराज काळोखे यांनी व्यक्त केली. तीर्थक्षेत्र येलवाडी येथे आयोजित महाशिवरात्रीनिमित्त शिवलीलामृत पारायण सोहळ्याच्या सांगता कार्यक्रमात त्यांनी कीर्तनातून समाजाला कर्मयोगाचा संदेश दिला.
*कोणी एकी भुलली नारी । विकितां गोरस ह्मणे घ्या हरी ॥॥ देखिला डोळां बैसला मनीं । तो वदनीं उच्चारी ॥ ॥ आपुलियाचा विसर भोळा । गोविंद कळा कौतुकें ॥॥ तुका ह्मणे हांसे जन । नाहीं कान ते ठायीं ||*
यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आधार घेत संतोष महाराज काळोखे यांनी निरूपण करताना सांगितले की, पूर्वी गवळणी दही-दूध विकताना देखील हरिनाम घेत असत. त्यांच्या दैनंदिन कर्मात भक्तीभाव अंतर्भूत होता. संतांनी कर्म करताना भक्ती विसरू नये, असा स्पष्ट संदेश दिला होता. मात्र आजचा समाज कर्मयोगाचा खरा अर्थ विसरून अंधश्रद्धा आणि कर्मकांडात अधिक गुंतत चालल्याचे त्यांनी नमूद केले.
तीर्थक्षेत्र येलवाडी येथे शुक्रवार (ता. १३) ते सोमवार (ता. १६) दरम्यान शिवलीलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन श्री येलेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले होते. या सोहळ्याची सांगता श्रीक्षेत्र देहू येथील हभप संतोष महाराज काळोखे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.
कीर्तनादरम्यान त्यांनी पुढे सांगितले की, पूर्वी संतांनी व्यवसाय करतानाच कीर्तन करून समाजप्रबोधन केले. परंतु आज काही ठिकाणी कीर्तन हे साधन न राहता व्यवसाय बनत चालले आहे, ही चिंतेची बाब आहे. संत परंपरेचा खरा वारसा जपण्यासाठी कर्मयोग, निस्वार्थ सेवा आणि नामस्मरण यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार
यावेळी खेड तालुक्याचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे तसेच कीर्तनकार संतोष महाराज काळोखे यांचा ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना गणेश बोत्रे यांनी धार्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहण्याची भूमिका व्यक्त केली. काही कारणास्तव कीर्तनाचा लाभ घेता आला नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास गावचे सरपंच रणजित गाडे, ग्रामपंचायत सदस्य, वारकरी, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.


