
पंकजा मुंडेंनी सांगितलं खरं कारण
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सर्वपक्षीय नेत्यांसह सुरेश धसांकडून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.तर दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे देशमुख कुटुंबीयाना भेटायला का गेल्या नाहीत?
असा सवाल देखील सातत्याने विरोधकांकडून विचारण्यात येत होता. अखेर पंकजा मुंडे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ज्यावेळी हे प्रकरण घडलं त्यावेळी परिस्थिती चिघळल्याने देशमुख कुटुंबीयांनी आपल्याला भेटायाला येऊ नका अशी विनंती केली होती. त्यामुळेच आपण त्यांना भेटायला गेले नसल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.
पंकजा मुंडे म्हणाल्या, मी देशमुख कुटुंबियांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्या परिस्थितीमध्ये त्यांनीच मला विनंती केली, परिस्थिती चांगली नाही तुम्ही येऊ नका . आता त्यांची परवानगी घेऊन जाईल असं मी आधीच जाहीर केलं आहे . माझ्या जाण्यापेक्षा, माझ्या जाण्याच्या आधी न्याय तिथे गेला पाहिजे . मी तिथे जाऊन भेट घेणे, संवेदना व्यक्त करणे हा माझा वैयक्तिक विषय आहे. त्याचा जगासमोर प्रगटीकरण करण्याची आवश्यकता नाही . देशमुख कुटुंबियांनाही माहिती आहे माझ्या मनात त्यांच्याविषयी सहानुभूती आहे
पालकमंत्रिपदावर बोलताना काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
मुंडे बहीण भावाल बीडचा पालकमंत्री दिले नाही यामागे षडयंत्र वाटतं का? यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मी असं काही मानत नाही. एकूण पुढची परिस्थिती पाहता पालकमंत्रीपद अजितदादांनी घ्यावं असं मी फार पूर्वी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा यापैकी कोणी नेतृत्व स्वीकारलं तर मी स्वागतच करणार आहे. त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आहे.
ऑनर किलिंगच्या घटनांवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, अशा घटना होऊ नये अशी समाजरचना व्हावी . आपण पुढे जाण्याऐवजी मागे चाललो. आपल्या समाजात मुलांना मुलींना त्यांचे जीवन जगण्यापासून कुणी रोखू शकत नाही . त्यांचा जगण्याचा अधिकार काढून घ्यायला आपण ईश्वर नाही . त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.