
अमेरिकेत ‘ट्रम्प युगाची’ सुरुवात झाली असून डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. ते अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर लगेचच त्यांनी कारभाराला सुरुवात केली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ते म्हणाले की माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी,आणि त्यांचे बंधू रॉबर्ट एफ केनेडी आणि मार्टिन लूथर किंग जूनियर यांच्या हत्येबाबतचा दस्ताऐवज लवकरच सार्वजनिक करणार आहे. अमेरिकन जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी ट्रम्प सरकारचा यामागील उद्देश आहे.
माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची 1963 मध्ये गोळी मारुन हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडामुळे अमेरिकेत अनेक दशकापासून वाद आणि षडयंत्र सुरु झाले होते. जॉन एफ केनेडी यांची हत्या ही इतिहासातील एक मोठी घटना आहे.
मार्टिन लूथर किंग यांची एप्रिल 1968 मध्ये त्यांची गोळी मारुन हत्या करण्यात आली होती. त्याच वर्षी जूनमध्ये रॉबर्ट एफ केनेडी यांचीही कॅलिफोर्नियामध्ये हत्या करण्यात आली होती. या तिन्ही हत्याकांडाबाबत अमेरीका हादरुन गेली होती. इतिहासात या तीनही घटना महत्वपूर्ण आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी ट्रम्प दुसऱ्यांदा विराजमान झाले आहेत.शपथ घेण्याआधी ट्रम्प यांनी अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जो बायडेन यांची व्हाईट हाऊसमध्ये जाऊन भेट घेतली.काल (सोमवारी) कॅपिटल रोटुंडा हॉलमध्ये ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा झाला. जगभरातील दिग्गजांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शाही शपथविधीला उपस्थिती लावली. या सोहळ्याला 800 हून अधिक पाहुण्यांनी हजेरी लावली.