
नाशिक-रायगडचा निर्णय बदलणार?
पालकमंत्रिपदाच्या यादीवरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे. अशाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दरेगावला गेल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाबद्दल भरत गोगावले यांनी मागणी केली ती काही चुकीची नाही, शेवटी त्यांनी रायगडमध्ये चांगलं काम केलं आहे.
मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
महायुती सरकारने पालकमंत्रिपदाची यादी जाहीर केली. पण नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रिपद आपल्याकडे न आल्यामुळे शिवसेनेत कमालीची नाराजी पसरली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरेगावी निघून आल्यामुळे नाराजी असल्याची चर्चा रंगली. अखेर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
“महायुतीच्या नाराजीबाबत तुम्हाला का प्रश्न पडतात, तुम्हाला जे प्रश्न होते तिकीट वाटपापासून मंत्रिमंडळापर्यंत ते सर्व प्रश्न सुटत गेले आहेत. गोगावले यांनी अपेक्षा करणे किंवा मागणी करणे यात काही चुकीचं नाही. शेवटी त्यांनी रायगडमध्ये अनेक वर्ष काम केलं आहे. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही सर्व बसून यावर मार्ग काढू अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली.
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत लवकरच मार्ग निघेल. तुम्हाला जेवढ्या चिंता आहेत त्या सगळ्यावर लवकरच मार्ग निघेल आणि निर्णय होईल’ असंही शिंदेंनी सांगितलं.
“नाराजी बाबत कोण काय बोलतंय, हे तुम्हीचं दाखवत आहात आणि आता तुम्हीच इथे बघत आहात मी इथे कामात आहे. नवीन महाबळेश्वरच्या मोठ्या प्रोजेक्टचा मी मागे लागलेलो आहे, हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि यासाठी मला गावी यावं लागेल आणि मी गावी आलो की लोक म्हणतात मी नाराज आहे. आतापर्यंत 235 गाव या प्रोजेक्टच्या अंतर्गत येत आहे आणि अजून 295 गावांनी मागणी केली आहे. मोठ्या प्रमाणावर सातारा जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल आणि त्यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत ते मला करावे लागतील’ असं सांगत शिंदे यांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं.