दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी प्रताप नागरे
वाशिम, दि. १३ फेब्रुवारी
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय, वाशिम यांच्या वतीने तंबाखू नियंत्रण कायदा (कोटपा) २००३ अंतर्गत पानटपरीधारकांवर विशेष कारवाई करण्यात आली. या मोहिमेत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या १८ पानटपरीधारकांवर दंडात्मक कारवाई करून एकूण ३ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वाशिम शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या सहकार्याने दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी ही कारवाई राबविण्यात आली. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर आणि वाशिम शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोटपा कायद्यातील कलम ६ (अ) व ६ (ब) चे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा परिसर, पाटणी चौक व रिसोड नाका या परिसरात तपासणी मोहीम राबवून संबंधित पानटपऱ्यांची पाहणी करण्यात आली.
या कारवाईत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. आदित्य पांडारकर, मानसशास्त्रज्ञ राम सरकटे, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे जिल्हा समन्वयक मंगेश गायकवाड, पोलीस कर्मचारी तसेच गृह रक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते.
तंबाखूविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी अशा कारवाया नियमितपणे सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
