दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी प्रताप नागरे
वाशिम, दि. १३ फेब्रुवारी
महाराष्ट्र शासन अंगीकृत महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त राज्यभरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येत असून, अमरावती विभागातून महिला सन्मानासाठी वाशिम जिल्ह्यातील लोकसंचालित साधन केंद्र, कारंजा अंतर्गत संचालक मंडळाच्या माजी सचिव तथा विद्यमान उपाध्यक्षा मंजुषा राजेंद्र ठाकरे यांची निवड करण्यात आली.
मुंबई येथे आयोजित “महाविकास २०२६ : महाराष्ट्र डायरेक्ट सेलिंग समिट” या राज्यस्तरीय कार्यक्रमात दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रतिष्ठेचा “आद्या पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. या सन्मानामुळे माविम वाशिम तसेच संपूर्ण अमरावती विभागाचा गौरव वाढला असून महिला सक्षमीकरणाच्या चळवळीला नवे बळ मिळाले आहे.
मंजुषा ठाकरे यांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबनाची चळवळ प्रभावीपणे उभी केली आहे. त्यांच्या पुढाकारातून तालुका कारंजा येथील ग्रामपंचायत वाई येथे स्वामी समर्थ महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली. या गटामार्फत सुरू करण्यात आलेला ‘स्वरा स्वादिष्ट पापड’ हा गृहउद्योग आज कारंजा शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरला असून अनेक महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सातत्याने केलेले त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरत असून, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माविम परिवारासह विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
