मंठा | प्रतिनिधी- सुरेश दवने
निवडणुकीच्या काळात मतदार म्हणजे पुढाऱ्यांसाठी देवासमान. प्रामाणिकपणे झेंडे हातात घेऊन मागे फिरणारे सभा-मेळाव्यांत गर्दी करणारे, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणारे कार्यकर्ते हवे असतात. मात्र निवडणूक पार पडताच चित्र पालटते.
गावातील रस्ते, पाणी, वीज, शासकीय योजना, अपूर्ण विकासकामे याबाबत नागरिकांनी जाब विचारला की काही लोकप्रतिनिधींची चिडचिड उफाळून येते, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.
“निवडणुकीपुरतेच आमचे महत्त्व का?” असा सवाल सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. मतदानाच्या वेळी गोड बोलणारे नेते निवडून आल्यानंतर मात्र साधं बोलु देत नाहीत, अशीही तक्रार आहे.
लोकशाहीत मतदार हा मालक असतो आणि निवडून आलेले प्रतिनिधी हे सेवक असतात, असे वारंवार सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात प्रश्न विचारणारा नागरिक काहींना डोळ्यात खुपतो असे चित्र दिसत आहे
निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा हिशेब मागितला की विषय बदलणे, जबाब टाळणे किंवा उलट नागरिकांनाच विरोधक ठरवणे — हा प्रकार थांबायला हवा, अशी मागणी नागरिकांच्या चर्चेतुन होत आहे.
लोकशाही केवळ मतदानाचा उत्सव नसून उत्तरदायित्वाची सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे, हे गावपुढाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असा स्पष्ट इशारा नागरिक देताना दिसत आहेत.
