
मीडियाला सूत्रांवरून कानपिचक्या..!
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांपूर्वी पार पडल्या. दरवेळीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदा पोस्टल मतदानाची मोजणी करण्यात आली. त्यातच आता अजित पवारांनी अर्थसंकल्पाबद्दल भाष्य केले.
आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना सूत्रांवरुन बातम्या चालवण्यावरूनही टोला लगावला आहे. मी जरा दिसलो नाही की अजित पवार नॉट रिचेबल बातम्या सुरू होतात. रोज येऊन रिचेबल व्हावं का? असा प्रश्न अजित पवारांनी विचारला.
अजित पवारांनी नुकतंच एका कार्यक्रमात भाषण केले. या कार्यक्रमावेळी बोलताना त्यांनी तुफान टोलेबाजी करत प्रसारमाध्यामांवरही टीका केली. “गेल्यावेळी निवडणुका असल्याने अर्थसंकल्पात मोकळा हात सोडला होता. मी सर्व विभागांच्या बैठका घेत आहे. यात अर्थसंकल्पावर चर्चा करत आहे. तुमचे पुरस्कार विलंबाने देताय तर मग माझ्याकडून काही विलंब झाला तर मलाही सांभाळून घेत चला…समजून घेत चला, असे अजित पवार म्हणाले.
मी तुमच्यापासून चार हात लांबायचा प्रयत्न केला. पण त्याचा तोटाच झाला. यात बदल करण्याचा मी प्रयत्न करत आहे. सैफवर हल्ला झाल्यावर लगेच कायदा सुव्यवस्था ढासळली असं बोललं जात आहे. बांग्लादेशात परत जायला त्याला ५० हजार पाहिजे होते. म्हणून तो सैफच्या घरात गेला. त्याला कुणाचे घर आहे ते माहिती नव्हते, असा खुलासा अजित पवारांनी केला.
या टीआरपीने नको नको ते करून ठेवलंय
अजित पवार पोस्टल बॅलेटमध्ये मागे, अशी बातमी दाखवल्यावर माझी आई काटेवाडीत माळ जपायला लागली. मी संबंधित बातमीदाराला विचारल्यावर तो टीआरपीसाठी चालवली, असं म्हणाला. मी म्हटले अरे शहाण्या माझी आई वृद्ध आहे. ती धसका घेईल ना.. मिडिया ट्रायलची किंमत मी मोजली आहे. ७० हजार कोटींचा घोटाळासंदर्भात कितीतरी बातम्या दाखवण्यात आल्या. अजूनपर्यंत विविध चौकशी सुरू होत्या. बातमी दाखवताना संवेदनशीलता हवी. या टीआरपीने नको नको ते करून ठेवलंय, असेही अजित पवार म्हणाले.
सुत्रांनाही तुम्ही एखादा जीवनगौरव पुरस्कार द्या
मी जरा दिसलो नाही की अजित पवार नॉट रिचेबल बातम्या सुरू होतात. रोज येऊन रिचेबल व्हावं काय. त्या सूत्रांना एकदा मी घेऊन बसणार आहे. त्या सुत्रांनाही तुम्ही एखादा जीवनगौरव पुरस्कार द्यावा. संबंधित निधी राष्ट्रीयकृत बँकेतच ठेवा. नाहीतर मुंबई जिल्हा बँकेत ठेवाल. सध्या सगळीकडे मुंबई बँकेत सुरु आहे, असा टोलाही अजित पवारांनी लगावला.