प्रतिनिधी स्वाती हडकर
चिपळूण : देशातील विविध दहा कामगार संघटनांनी गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी “भारत बंद”ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनीही या भारत बंदला पाठिंबा दिला आहे.
ही बाब लक्षात घेता अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कडून दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या भारत बंदला काँग्रेस पक्षाने पाठिंबा देण्याबाबतच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार उत्तर रत्नागिरीतील काँग्रेस पक्षाने या बंदमध्ये सहभागी होऊन संपूर्ण पाठिंबा द्यावा, असे आवाहन काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग यांनी केले आहे.
केंद्र शासनाने कामगार कायद्यात केलेल्या विविध बदलांमुळे कामगारांच्या हिताला बाधा पोहोचली असून कामगारांच्या हाताला काम मिळण्याच्या संधी कमी झाल्या आहेत. केंद्र शासनाचे आर्थिक धोरण सुद्धा कामगार व शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यानुसार देशातील विविध कामगार संघटनांनी दिलेल्या भारत बंदच्या हाकेला काँग्रेसनेही पाठिंबा दर्शविला असून उत्तर रत्नागिरीतील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
