
संजय राऊतांचा नवीन बॉम्ब, रोख शिंदे सेनेकडे, चर्चेला पेव फुटले..!
उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची तोफ दिवसागणिक आग ओकत आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी शिंदे सेनाच फुटीवर असल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दावोस दौऱ्यात महाराष्ट्रीतील गुंतवणुकीची चर्चा न होता महायुतीमधील भूकंपाची चर्चा अधिक रंगली.
दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे गटाला भगदाड पाडण्याचा दावा केला आहे. तर आज संजय राऊत यांनी सकाळीच मोठा बॉम्ब टाकला. राज्याला नवीन तिसरा मुख्यमंत्री मिळणार असल्याचा दावा करत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. काय म्हणाले संजय राऊत?
शिंदे सेनेवर प्रहार
मी हिंदुहृदयसम्राटांचा विचार नेणारा एकमेव व्यक्ती आहे असं सांगितलं जातं. मुळात बाळासाहेबांनी कुणाची लाचारी पत्करायला शिकवलं नाही, असा पलटवार राऊतांनी केला. आज जो काही बूट चाटेपणा सुरू आहे. हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता. भ्रष्टाचार, महाराष्ट्राची लूट, महाराष्ट्राचं अध:पतन आणि उघड्या डोळ्यांनी पाहणारे लाचार राज्यकर्ते यात हे लोक सहभागी आहेत, हा जर बाळासाहेबांचा विचार आहे असं वाटत असेल तर हा महाराष्ट्र अत्यंत धोकादायक लोकांच्या हाती गेला आहे, असं मानतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
एकनाथ शिंदे हे तर जयचंद
एकनाथ शिंदे हे काही शिवसेनाप्रमुख नाहीत किंवा शिवसेनाप्रमुखांचे वारसदार नाहीत. एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोकं हे ईडी, सीबीआयच्या भीतीनं पळून गेलेले जयचंद आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. ज्याने महाराष्ट्राच्या शत्रूला मदत करायचं ठरवलं आपली कातडी वाचवण्यासाठी. हे राज्याला माहीत आहे. तुमच्याकडे भ्रष्ट मार्गाने मिळवलेला अमाप पैसा आहे, त्यातून मतदार, संस्था आणि यंत्रणा विकत घेत आहात. त्यातून निवडणूक जिंकत आहात. असं राजकारण करत असाल तर बाळासाहेब अशा पैशाच्या राजकारणारा वेश्येचं राजकारण म्हणायचे. ते राजकारण एकनाथ शिंदे करत आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेवर थुंकण्याचं काम करत आहेत, अशी बोचरी टीका राऊतांनी केली.
हेच अमित शाह आणि मोदींना हवं आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून एक समांतर शिवसेना अमित शाह यांनी सुरू केली. पुराणात सृष्टी आणि प्रतिसृष्टी होती. ती प्रतिसृष्टी काही टिकली नाही. शिर्डी आणि प्रति शिर्डी असते. लोकं शिर्डीलाच जातात. पंढरपूर आणि प्रतिपंढरपूर असते, लोकं पंढरपूरलाच जातात, असा चिमटा त्यांनी काढला.
राज्याला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांचं प्रकरण फार गांभीर्याने घेऊ नये. त्यांनी पालकमंत्रीपदाचा वाद सोडवावा. काल मुख्यमंत्री होते, आज उपमुख्यमंत्री आहेत. उद्या तेही राहणार नाही. कारण तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच महाराष्ट्राला मिळतो. तो त्यांच्याच पक्षातील आहे. त्याचा त्यांनी विचार करावा. मी नाव घेत नाही. पडद्यामागे सुरू आहेत. एका राज्याला तीन उपमुख्यमंत्री मिळणार आहे. यांचं वजन होतं कुठे. टायरमध्ये पंपाने हवा भरतात, तसे अमित शाहने तयार केलेले हे नेते आहेत, असा बॉम्ब त्यांनी टाकला.