
एसपींकडून चौकशीचे आदेश, PI शीतल बल्लाळ म्हणाले…
सनी आठवले आपला पोरगा आहे, त्याला संशयित म्हणून अडकवू नका, अशी विनंती करणारा फोन वाल्मिक कराड याने बीडमधील पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांना केल्याचे आरोप होत आहेत. समाजमाध्यमांवर तशी ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून वाल्मिकचा प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर दबाव होता, असेही सांगितले जात आहे.
परंतु वाल्मिकने फोन केल्याचे आणि त्याला मदत करण्याचे आश्वासन असले प्रकार खोटे आहेत, असे सांगत होणाऱ्या आरोपांचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी खंडन केले आहे.
आवादा पवन ऊर्जा कंपनीचे खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड याचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. आता थेट गुन्हेगारांना सोडून देण्यासाठी पोलीस निरीक्षकांनाच फोन केल्याचे आणि पोलिसांनाही त्याच्या विनंतीला मान दिल्याचा दावा व्हायरल ऑडिओ क्लिपमधून करण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार असल्याचे बीडच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितल्यानंतर आता पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
व्हायरल कॉलवर’ पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ म्हणाले…
पोलीस निरीक्षक शीतल बल्लाळ यांनी यासंदर्भातील आरोप फेटाळले आहेत. बनावट चलनी नोटा प्रकरणात सनी आठवले याचा सहभाग आढळून आला असून तो याप्रकरात अडकला आहे. बाहेर राहून अशा प्रकारचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करून पोलिसांवर दबाव निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. परंतु अशा फोन रेकॉर्डिंगचा काहीही फायदा होणार नाही. तो माझा आवाज नाहीच, अशा शब्दात आपल्यावरील आरोपांचे खंडन करून आरोपीवर सायबर अॅक्टखाली आम्ही गुन्हा दाखल करतो आहे, असे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी सांगितले.
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधवा आवाज अगदी माझ्यासारखाच आहे पण संबंधित ऑडिओ क्लिप बनावट आणि फेक आहे. एआय वापरून संबंधित ऑडिओ क्लिप बनवली गेल्याचा दावा पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी केला आहे.
बीडच्या परिस्थितीचा दुर्देवाने काही लोक फायदा उठवू इच्छितात. सनी आठवले हा बनावट चलनी नोटा प्रकरणात आरोपी आहे. त्याला अटक होणार नाही, आम्ही त्याचा शोध घेत आहोत. पोलिसांनी अटक करू नये, बदल्याच्या भावनाने किंबहुना पोलिसांवर दबाव येण्याच्या भावनेने तो असे कॉल व्हायरल करण्यासारखी कृत्ये करत असावा परंतु आम्ही मागे हटणार नाही, आम्ही चांगलं काम करतोय, करत राहू, असे पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी सांगितले.
तसेच सत्यता पडताळणीसाठी सायबर विभागाला अर्ज केला आहे. सायबर विभाग सत्यता पडताळतील आणि आवश्यक कारवाई करतील. परंतु हे नक्की आहे की पोलिसांनी कारवाई करू नये, यासाठीच आरोपी सनीचा हा सगळा प्रयत्न असल्याचे वारंवार बल्लाळ यांनी सांगितले.