
इंग्लंडसाठी ‘करो या मरो’, कोण जिंकणार?
सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने नववर्षात अप्रतिम सुरुवात केली. टीम इंडियाने 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेत सलग 2 सामने जिंकले. टीम इंडियाने यासह 2-0 अशी आघाडी मिळवली.
त्यामुळे राजकोटमध्ये होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याची दुहेरी संधी टीम इंडियाकडे आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडसाठी हा ‘करो या मरो’ असा सामना हा आहे. इंग्लंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत तिसऱ्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात चांगलीच चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाने बुधवारी 22 जानेवारीला इंग्लंडवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने यासह मालिकेत विजय सलामी दिली. तर 25 जानेवारीला रंगतदार सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर 2 विकेट्सने विजय मिळवत मालिकेतील आघाडी आणखी मजबूत केली. चेन्नईत झालेल्या या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने दिलेलं 166 धावांचं आव्हान टीम इंडियाने 4 चेंडू राखून 8 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. तिलक वर्मा हा विजयाचा नायक ठरला. तिलकने 55 बॉलमध्ये नॉट आऊट 72 रन्स करत भारताला विजयी केलं.
टीम इंडियाची हॅटट्रिक की इंग्लंडचं कमबॅक?
इंग्लंडला आता मालिकेतील आव्हान कायम ठेवायचं असेल, तर तिसऱ्या सामन्यात जिंकावंच लागेल. इंग्लंड त्यासाठी सज्ज आहे. इंग्लंडने सामन्याच्या 24 तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर करत आपण तयार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता टीम इंडिया विजयी हॅटट्रिकसह मालिका जिंकते की इंग्लंड बरोबरी करत टीम इंडियाला रोखते? याकडे साऱ्यांचं लक्ष असेल.
इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी सुधारित भारतीय क्रिकेट संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे आणि रमणदीप सिंग.
तिसऱ्या टी 20i सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जॉस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, लियाम लिविंगस्टोन, जेमी स्मिथ, जेमी ओवरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद आणि मार्क वुड.