पुणे प्रतिनिधी: आपले कर्तव्य बजावत असताना कर्तव्याबरोबर आपण प्रामाणिक असणं हेही आजच्या स्वार्थी युगात खूप महत्त्वाचे आहे.वाहक प्रशांत भोसले आणि चालक गणेश बारवकर हे पुण्याची जीवन वाहिनी असणाऱ्या पीएमपीएमएलच्या स्वारगेट आगारात सेवेत आहेत.
आपली सेवा बजावत असताना एका प्रवाशाची बॅग बसमध्ये विसरली.सदर बॅग वाहक प्रशांत भोसले यांचे निदर्शनास आली.त्यांनी तात्काळ चालक गणेश बारवकर यांचेही सदर बॅग निदर्शनास आणून दिली.सदर बॅग उघडून पाहता त्यामध्ये असुस कंपनीचा महागडा लॅपटॉप आणि इतर काही मौल्यवान वस्तू आढळून आल्या.बॅगेतील लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तूंची खातरजमा करून व त्या प्रवाशाची ओळख पटले नंतर सर्व मौल्यवान साहित्य सदर प्रवाशास प्रामाणिकपणे वाहक प्रशांत भोसले आणि चालक गणेश बारवकर यांनी परत केले.
वाहक प्रशांत भोसले आणि चालक गणेश बारवकर यांच्या प्रामाणिकपणाची दखल घेऊन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना व साप्ताहिक पोलीस तपास यांचे संयुक्त विद्यमाने या दोन्ही पीएमपीएमएलच्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान स्वारगेट आगारचे आगारप्रमुख श्री शैलेश नाईक आणि ओ .एस .श्री सुनील कांबळे यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि तुळशीचे रोप देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष चेतन शर्मा आणि साप्ताहिक पोलीस तपास वृत्तपत्राचे संस्थापक राजु जाधव यांनी पीएमपीएमएलचे वाहक प्रशांत भोसले आणि चालक गणेश बारवकर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पीएमपीएमएलचे कर्मचारी उपस्थित होते.
