
परराष्ट्रमंत्र्यांनी दिलं संसदेत उत्तर
ट्रम्प सरकारच्या आदेशानंतर अमेरिकेत बेकायदेशीर वास्तव करणाऱ्या 104 भारतीय नागरिकांना घेऊन लष्कराचे विमान बुधवारी अमृतसरमध्ये दाखल झालं.
तेव्हा या नागरिकांना अट्टल गुन्हेगारांसारखं हातात बेड्या घालून आणण्यात आल्याचं दिसलं. प्रवासादरम्यान या भारतीय नागरिकांच्या हात-पायांना बेड्या ठोकलेल्या होत्या, यावर आता परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी संसदेत उत्तर दिलंय.
अमेरिकेतून भारतीयांच्या परतण्यावरून संसदेत सुरू असलेला गोंधळ शांत करण्यासाठी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत उत्तर दिलंय. या सर्व भारतीयांना अमेरिकन हवाई दलाच्या विमानात असं बांधून का ठेवलं होतं, हे देखील स्पष्ट केलंय. एस जयशंकर म्हणाले, ‘जर त्यांचे नागरिक परदेशात बेकायदेशीरपणे राहत असल्याचं आढळलं तर आपापल्या नागरिकांना परत बोलावण्याची जबाबदारी प्रत्येक देशाची आहे. अमेरिकेत ही प्रक्रिया तेथील इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) प्राधिकरणाकडून केली जाते.
भारतीयांना हाताने साखळदंडाने बांधल्याच्या वादावर बोलताना परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले की, 2012 पासून लागू असलेल्या नियमानुसार, जेव्हा लोकांना विमानाने परत पाठवले जाते, तेव्हा त्यांना सुरक्षिततेसाठी रोखून ठेवले जाते, परंतु आयसीईने आम्हाला सांगितलंय की महिला आणि मुलांना या प्रक्रियेतून सूट आहे, म्हणजेच त्यांना बांधलेले नाही. एस जयशंकर पुढे म्हणाले की, परत येणाऱ्या निर्वासितांना कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन सहन करावे लागू नये, यासाठी आम्ही अमेरिकन सरकारशी चर्चा करत आहोत.
अमृतसरमधील श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल दुपारी 104 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन जाणारे अमेरिकन लष्करी विमान उतरले. हद्दपार केलेल्या लोकांपैकी 30 जण पंजाबचे, 33 जण हरियाणा आणि गुजरातचे, प्रत्येकी 33 जण महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे आणि दोन जण चंदीगडचे आहेत. हद्दपार केलेल्यांमध्ये 19 महिला आणि 13 अल्पवयीन मुलांचा समावेश होता. यात एक चार वर्षांचा मुलगा आणि पाच आणि सात वर्षांच्या दोन मुलींचा समावेश होता.