दैनिक चालू वार्ता शिरूर प्रतिनिधी -इंद्रभान ओव्हाळ.
शिरूर, दि. १० फेब्रुवारी २०२६ – बाल मित्र ग्राम शिरूर ग्रामीण येथे शिरूर तालुक्यातील ४० बाल मित्र ग्रामांमधील १०६ मुलांना सायकल वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. बाल मित्र ग्राम प्रकल्पांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश भिल्ल, पारधी व इतर वंचित वस्त्यांतील त्या मुलांना प्रोत्साहन देणे हा होता, जे आपल्या समुदायामध्ये करुणेच्या माध्यमातून बालविवाह, बालमजुरी, अशिक्षा आणि जातीय भेदभाव यांसारख्या सामाजिक कुप्रथांविरुद्ध सक्रियपणे परिवर्तनकर्त्यांची भूमिका बजावत आहेत.
कार्यक्रमाला नगरसेवक अमोल चव्हाण, विस्तार अधिकारी धोत्रे सर, बापूसाहेब काळे व राणीताई कर्डीले , ग्रा. प करडेलवाडी सरपंच लता कर्डीले, सदस्य किशोर कर्डीले आणि शिरूर ग्रामीण च्या सरपंच कु .शिल्पा गायकवाड , ग्रा .प. तरडोबाचीवाडी सदस्य संदीप पवार, ग्रामपंचायत शिरूर ग्रामीण, सचिन घावटे उपसरपंच, माजी उपसरपंच बाबाजी आण्णा वर्पे,माजी सरपंच अरुण तात्या घावटे, नामदेव तात्या जाधव, सोशल मीडिया अध्यक्ष सागर संकपाळ तसेच महाबाल पंचायत चे सदस्य निशांत नरके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते शिरूर तालुक्यातील ४० बाल मित्र ग्रामांमधून सहभागी झालेल्या १०६ बालकांना सायकलींचे वितरण करण्यात आले. हे सर्व विद्यार्थी बाल पंचायतांशी संलग्न असून करुणेच्या मूल्यांवर आधारित कार्य करत सामाजिक परिवर्तनासाठी सातत्याने योगदान देत आहेत.
सायकल मिळाल्यामुळे दूरस्थ गावांमध्ये व वाड्यावस्त्यामध्ये राहणाऱ्या मुलांना शाळेत ये-जा करणे अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणातील सातत्य टिकून राहण्यास मदत होईल तसेच आत्मविश्वासातही लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
हा उपक्रम कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाउंडेशन, सत्यार्थी मूव्हमेंट फॉर ग्लोबल करुणा यांच्या माध्यमातून, नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी व अस्मिता सत्यार्थी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
कार्यक्रमामुळे बालमित्र ग्राम संकल्पनेला अधिक बळ मिळाले असून सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने मुलांचे पाऊल अधिक भक्कम झाले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
