दै. चालु वार्ता, पैठण प्रतिनिधी, तुषार नाटकर-
छ. संभाजीनगर (पैठण) : पैठण शहरातील नाथ मंदिर परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान आज दुपारी मोठा गोंधळ उडाला. सुमारे 12.30 वाजण्याच्या सुमारास काही व्यापाऱ्यांवर पोलिसांकडून मारहाण व शिवीगाळ झाल्याचा आरोप पुढे आला आणि वातावरण तणावपूर्ण बनले. प्रत्यक्षदर्शी व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कारवाई सुरू असताना त्यांनी कोणताही विरोध केला नव्हता. तरीही काही पोलीस कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरत ढकलाढकली केली, मारहाण केली आणि अपमानास्पद शब्द वापरले. अतिक्रमण हटाव ही कारवाई शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत व्हायला हवी होती; मात्र घडलेल्या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती आणि संताप पसरला. या घटनेच्या निषेधार्थ पैठण शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. अनेक दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद राहिली. व्यापारी एकत्र येत घटनेचा निषेध नोंदवत राहिले. घटनेची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या समक्ष आमदार विलास भुमरे यांच्यासह प्रतिनिधींनी चर्चा केली. चर्चेनंतर अतिक्रमण हटाव मोहीम तात्पुरती थांबवण्यात आली. पुढे सर्व व्यापाऱ्यांशी समक्ष चर्चा करून जागांचे मार्किंग केल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे ठरले. या प्रकरणात संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे, नगराध्यक्षा विद्या भूषण कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार सूर्यभान पाटील तसेच नगरसेवकांनी व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहत सहकार्य दर्शविले. व्यापाऱ्यांना धीर देत योग्य तो न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. दरम्यान, व्यापारी महासंघाच्या वतीने पोलीस अधिक्षक (ग्रामीण) छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई व निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करत व्यापारी प्रतिनिधींनी पुढील चर्चेसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघेल आणि शहरातील वातावरण पुन्हा सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष स्वदेश पांडे, सचिव उमेश तट्टू पाटील, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर उगले, सचिव रामेश्वर सुसे, अध्यक्ष श्याम पंजवानी, संदिप सारडा, मधुसुदन मुंदडा, उमेश बाहेती, अमित नागोरी, जितु पांडे, निलेश बाहेती, अशोक वाघ, महेश मुंदडा, सचिन लाखोटिया यांच्यासह शहरातील सर्व व्यापारी उपस्थित होते.
