
पडद्यामागं राजकीय हालचालींना वेग…
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीला मोठा धक्का देत राज्यात सत्ता स्थापन केली. परंतु, प्रचंड बहुमताने सत्तास्थापन होऊनही महायुतीमध्ये अंतर्गत वाद असल्याचे पाहायला मिळत आहेत.
अनेकदा हे वाद समोर देखील आले आहेत.
महायुतीमधील अनेक नेते नाराज असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. लवकरच महापालिका निवडणुकांच्या (Municipal elections) तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. त्याच पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेते आतापासूनच तयारीला लागले आहेत.
निवडणुकीपूर्वी भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू बैठका सुरु आहेत. या बैठकांमध्ये भाजपकडून स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजप आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
जर भाजपने आगामी निवडणूक स्वबळावर लढवली तर शिंदे गट आणि अजित पवार गट देखील या निवडणुका स्वबळावर लढवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. जर या तिन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या तर कदाचित याचा त्यांना फटका देखील बसू शकतो, असे बोलले जात आहे.
परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा केव्हा जाहीर होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या दोन ते तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार असल्याची माहिती दिली होती. परंतु, निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नाहीत.